होमपेज › Pune › विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण आवश्यक

विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण आवश्यक

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:35AMपुणे: प्रतिनिधी

आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे. मात्र बर्‍याचदा विद्यार्थ्यांना हे ज्ञान चुकीच्या माध्यमांतून मिळते. आणि त्याचे दुष्परिणाम  पौगंडावस्थेतील मुलांना भोगावे लागतात त्यामुळे लैंगिक शिक्षणासाठी  अधिकृत स्रोत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण मंत्री  विनोद तावडे  यांनी केले.

स्टेप अप फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समयोचित सम्यक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात  महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मुख्य शिक्षण अधिकारी दीपक माळी, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर स्टेप अप फाऊंडेशनच्या संस्थापिका गौरी वेद, शिरिष जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी  तावडे म्हणाले, लैंगिक शिक्षणाचे धडे योग्य वयातच मिळायला हवेत. अनेकदा  पौगंडावस्थेतील मुलांना चुकीची माहिती मिळते आणि तसे  प्रयोग त्यांच्याकडून केले जातात. चुकीच्या माहितीचे दुष्परिणाम  भोगावे  लागतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना योग्य वेळी चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणे अतिशय महत्वाचे असते. याहीबाबतीत पुष्कळदा फक्त चांगल्या वाईट मार्गांची जाणीव करून देण्यात येते परंतु, प्रत्यक्ष ज्ञान देण्यात येत नाही. यामुळे अशी अर्धवट राहिलेली जिज्ञासा विद्यार्थ्यांचे नुकसान करते.स्टेप अप फाऊंडेशन विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे लैंगिक शिक्षणाचे ज्ञान देत आहे. फाऊंडेशन संवादाच्या माध्यमातून किशोरवयीन मुला मुलींच्या लैंगिक भावनांना योग्य दिशा देण्याचे  काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्टेप अप फाऊंडेशनचे अभिनंदन करून लैगिंक शिक्षणाचे असे  प्रयोग राज्यातील इतर शाळांमध्येही राबविणार असे अभिवचन दिले.  

यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी लैंगिक शिक्षण व मुल्यवर्धित शिक्षणाचेे महत्व विषद केले.   यावेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लैंगिक शिक्षणामुळे  घडलेल्या बदलांचे अनुभव सांगितले. कार्यक्रमात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

लैंगिक शब्द उच्चारला की मोठ्यांच्या मनात चुकीच्या भावना निर्माण होतात. मात्र लहान मुलांची मने निरागस, निष्पाप असतात त्यामुळे लैंगिक शिक्षण याऐवजी किशोरवयीन आरोग्य शिक्षण हा शब्दप्रयोग करण्याची सूचना तावडे  यांनी यावेळी केली.या शब्दप्रयोगामुळे पालकांना त्रास होणार नाही ना समाजाला असेही तावडे यांनी नमूद केले.