होमपेज › Pune › उत्पन्न, ग्लॅमरमुळे ललित कलेकडे विद्यार्थ्यांचा ओढा

उत्पन्न, ग्लॅमरमुळे ललित कलेकडे विद्यार्थ्यांचा ओढा

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:36AMपुणे : केतन पळसकर

शासनातर्फे करण्यात आलेल्या पाहणीतून ललित कलेकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त असल्याचे दिसून आले आहे. ललित कलेमधून मिळणारे ‘उत्पन्न’ आणि सामाजिक स्तरातून मिळणारे ‘ग्लॅमर’ यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा या क्षेत्राकडे जास्त असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी ‘दै.पुढारी’कडे व्यक्त केले आहे.

सिनेमा, नाटक, टेलिव्हिजन, संगीत यासारख्या ललित कलेमधून कलाकारांना प्रचंड ग्लॅमर मिळते. समाजाकडून अशा कलावंतांना मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळते. सैराटसारख्या गाजलेल्या चित्रपटामधून ग्लॅमर मिळविलेल्या कलावंतांना समाजाने डोक्यावर घेऊन मिरविल्याचे आपण पाहतो आहेच. याच ग्लॅमरची भुरळ विद्यार्थ्यांना पडलेली पाहायला मिळते आहे. या क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न देखील भरघोस असते.
कलावंतांना लाखांच्या घरात मिळणार्‍या मानधनाचे नेहमीच सामान्यांना आकर्षण असते. त्यांच्या मानधनाची चर्चा समाजामध्ये होत असते. मनमोहीत करून टाकणार्‍या या रक्कमांकडे विद्यार्थी वर्गसुद्धा आकर्षीत झालेला यातून दिसून येतो आहे. राज्य शासनातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालानंतर कुठले क्षेत्र निवडाल? याची कल चाचणी घेण्यात आली. यामध्ये सुमारे 45 हजार 963 विद्यार्थ्यांनी ललित कलेला पसंती दिली. ललित कलेमध्ये चित्रपट, नाटक यासह चित्रकला, मूर्तिकला, नृत्यकला, इंटेरीअर डिझाईन, पेंटिंग आदी कलांचा समावेश होतो.

या विविध कलांचे शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यापीठासह विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे, हे शासनाने घेतलेल्या कल चाचणीमधून पाहायला मिळाले. याबाबत कला क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले, मनोरंजनाच्या चढत्या आलेखामुळे चित्रपट, टेलिव्हिजन आणि समाज माध्यमामधून या क्षेत्राला मिळणारे ग्लॅमर, भरघोस उत्पन्न आणि आपण काही तरी करू शकतो, हा मिळालेला विश्‍वास आजच्या पिढीला या क्षेत्राकडे खेचतो आहे.