Sun, Aug 18, 2019 21:20होमपेज › Pune › ‘अनफिट’ बसमुळे विद्यार्थी असुरक्षित

‘अनफिट’ बसमुळे विद्यार्थी असुरक्षित

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 10:16PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्कूलबसमध्ये अतिरिक्‍त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. ‘आरटीओ’ कार्यालय तपासणी करत असले तरी त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पालकांमध्येही याबाबत जागृती नसल्यामुळे ते विद्यार्थ्यांना बसमधून पाठवित आहेत. त्यामुळे शहरातील स्कूलबसमुळे विद्यार्थीसुरक्षा धोक्यात आली आहे.  

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्कूलबसची वाहन योग्यता तपासणी करण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने हायकोर्टाने उन्हाळ्याच्या सुटीत सर्व स्कूलबस आणि स्कूलव्हॅन मालकांनी वाहनांची तपासणी करून घेण्याचे आवाहन आरटीओने केले होते; मात्र सर्रास स्कूल बसचालक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. स्कूलबस, व्हॅनचे योग्यता प्रमाणपत्र वैध असेल, अशा वाहनांनीही चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. तपासणी न होणार्‍या वाहनांना विद्यार्थी वाहतुकीस परवानगी देण्यात येत नाही. 

पिंपरी-चिंचवड शहरात मात्र अनेक स्कूलबसचालक अधिकचे विद्यार्थी भरून वाहतूक करत आहेत. नियमानुसार एका स्कूल बसमध्ये दोन बाके असतील तर तीन विद्यार्थी नेण्याची परवानगी दिली जाते. तीन बाके  असतील तर चार विद्यार्थी नेण्याचा नियम आहे; मात्र ठरलेल्या नियमापेक्षा जास्त विद्यार्थी भरले जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. पालकांमध्येही जागृती नाही. त्यामुळे स्कूलबसचालकांच्या विश्‍वासावर ते आपले पाल्य सोडत आहेत. आरटीओकडून या स्कूलबसची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आम्ही प्रत्येक वेळी स्कूलबसची तपासणी करत असल्याची माहिती अधिकारी सांगत आहेत. सध्या कोणतीच कारवाई आरटीओकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.