Sun, May 19, 2019 13:57
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › साहित्य खरेदीची रक्कम थेट विद्यार्थ्यांना

साहित्य खरेदीची रक्कम थेट विद्यार्थ्यांना

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या गणवेश आणि शालेय साहित्य खरेदीसाठीची रक्क्कम थेट विदयार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार तसेच दर्जेदार साहित्याची खरेदी करता येणार आहे.स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, मोजे, दप्तरे, वह्या, चित्रकला साहित्य, लेखन साहित्य, पाट्या,  ट्रॅक सूट-बूट आणि स्वेटर, रेनकोट, आदी शालेय साहित्य महापालिकेकडून मोफत दिले जाते. या साहित्याच्या वाटपासाठी गतवर्षी  प्रशासनाने थेट हस्तांतरण योजना राबविली होती. मात्र, त्यात ठराविक ठेकेदारांकडून हे साहित्य वाटले गेले होते. तसेच निकृष्ट साहित्य वाटपाचा प्रकार घडला होता. त्यामुळे प्रशासनाने यावर्षी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात गणवेश व साहित्य खरेदीची रक्कम जमा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, पुन्हा गतवर्षी प्रमाणेच डीबीटी योजना राबविण्याचा घाट काही ठेकेदार आणि नगरसेवकांनी घातला होता. अखेर स्थायीने विद्यार्थ्यांना थेट रक्कम देण्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब केले.

नव्याने समाविष्ट गावांसह महापालिकेचे प्राथमिक आणि माध्यमिक असे जवळपास 1 लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत. त्यामधील जवळपास 60 हजार विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांची जनधन योजनेत जी बँक खाती उघडण्यात आली आहेत त्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार दोन हजारांपासून साडेचार हजारपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे.

गणवेशासाठी विद्यार्थ्यांची पुन्हा वणवण 

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याबरोबर त्यांच्या गणवेशाचा रंग बदलण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. स्थायीने त्यास मंजुरी दिली. मात्र, गणवेशाचा रंग कायम ठेवला आहे. आता जो गणवेश आहे तो बाजारात सहजरित्या उपलब्ध होणार का, याबाबत शंका आहे. त्यामुळे गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांची पुन्हा वणवण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.