Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › Pune › विद्यार्थी कंगाल तर बँका मात्र मालामाल

विद्यार्थी कंगाल तर बँका मात्र मालामाल

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 13 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठीचे अनुदान यंदा थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले. मात्र, ज्या बँकामध्ये हे अनुदान जमा करण्यात आले आहे, त्यांनी खात्यांमध्ये कमी रक्कम (मिनिमम बॅलन्सच)े कारण दाखवून या अनुदानाला कात्री लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे बँका मालामाल आणि विद्यार्थी कंगाल अशी अवस्था निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने यंदा थेट हस्तांतरण योजना (डीबीटी) राबविली, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांवर अनुदानाची रक्कम टाकण्यात आली आहे. प्रामुख्याने गणवेश, वह्या, दप्तरे, बुट यांची रक्कम निश्‍चित करून ती टाकण्यात आली आहे. ही रक्कम 1 हजार 500 ते 2 हजार 700 रुपयांपर्यंत आहे. त्यातून पालकांनी विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करायची आहे. पालिकेच्या प्राथमिक शाळांमधील 89 हजार 590 पैकी 74 हजार 827 मुलांची बँक खाती असून त्यापैकी 66 हजार 527 मुलांच्या खात्यात 12 कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. मात्र, आता बँकांनी किमान शिल्लक रकमेचा नियम दाखवून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमधील रक्कमेला कात्री लावण्यास सुरवात केली आहे. परिणामी, जवळपास 40 टक्के रक्कम बँकेतच शिल्लक म्हणून ठेवण्याची वेळ आली आहे. त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून बँकानी वजा करून रक्कमांमुळे साहित्य खरेदीसाठी रक्कम अपुरी पडत आहे. त्यामुळे पदरमोड करून साहित्य खरेदी करण्याची वेळ पालकांवर आली आहे. त्यासंबधीच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे डीबीटी योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना होण्याऐवजी बँकानाच अधिक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.