Fri, Mar 22, 2019 07:55होमपेज › Pune › छेडछाडीला त्रासून विद्यार्थिनीची आत्महत्या

छेडछाडीला त्रासून विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:34PMबारामती : प्रतिनिधी

तरुणाच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या आकांक्षा प्रदीप दरेकर (वय 16, रा. दरेकरवस्ती, सोनगाव, ता. बारामती) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा बुधवारी (दि. 22) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी महेश नानासाहेब मासाळ (रा. झारगडवाडी, ता. बारामती) याच्याविरोधात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा; तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप पोलिसांनी त्याला अटक मात्र केलेली नाही.

याबाबत आकांक्षा हिचा चुलत भाऊ सुरज शहाजी दरेकर यांनी फिर्याद दाखल केली. मयत आकांक्षा ही डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असल्यापासून महेश मासाळ तिला येता-जाता त्रास देत होता. दहावी उत्तीर्ण झाल्यावर आकांक्षा हिने बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. ती एस.टी. बसने ये-जा करीत होती. बसमध्येही तो तिला सातत्याने त्रास देत होता. यासंबंधी फिर्यादीने गावातील रत्नसिंह कालगावकर, रणजित कालगावकर यांच्यासह मासाळ यांच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना कल्पना देऊन मुलाला समजावून सांगण्याची विनंती केली होती; परंतु त्यानंतरही मासाळ याच्याकडून मुलीला त्रास देणे सुरूच राहिले.  

दि. 10 रोजी ती महाविद्यालयातून घरी आल्यानंतर तिने मासाळ हा सारखा त्रास देत असून, आज त्याने पाठीमागे येऊन माझी छेड काढल्याचे कुटुंबीयांना सांगितले. नाराज अवस्थेतच ती तिच्या खोलीमध्ये जाऊन झोपली. दि. 11 रोजी सकाळी तिने घरामध्ये जनावरांच्या गोचिडासाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येताच तिला दुचाकीवरून तातडीने बारामतीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी (दि. 22) सकाळी तिचा मृत्यू झाला. 

बारामती शहर पोलिस झोपलेले

आकांक्षा हिला दि. 11 रोजी उपचारासाठी बारामतीत दाखल करण्यात आले. रुग्णालयाकडून खबर दिल्यानं तर शहर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तिचा जबाब घेतला. वास्तविक यावरून गुन्हा दाखल होणे अपेक्षित असतानाही गेले दहा दिवस पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही. अखेर तरुणीचा जीव गेल्यानंतरच यंत्रणेला जाग आली.