होमपेज › Pune › युवकांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या महिलेस अटक

युवकांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या महिलेस अटक

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 1:03AMपिंपरी : प्रतिनिधी

तरुणाला फोन करून जवळीक साधायची, त्यानंतर त्या तरुणाला लॉज किंवा इतर ठिकाणी बोलावून घ्यायचे, त्याच्यासोबत शारीरिक संबंध करायचे, ते झाल्यानंतर कुठेतरी चहा-नाष्टा करण्यात त्याला गुंतवायचे. दरम्यान आपल्या इतर साथीदारांना बोलावून ‘याने बलात्कार केला आहे, पोलिसांत तक्रार देण्याची भीती दाखवून’ त्याच्याकडून हजारो, लाखो रुपये उकळायचे. हे कृत्य करणार्‍या टोळीतील एका मुख्य महिलेस भोसरी पोलिसांनी दहा महिन्यांनंतर अटक केली आहे. त्या महिलेस न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

शबाना अय्याज शेख उर्फ शबाना राजेश वाघमारे (35, रा. विजयनगर, काळेवाडी) या महिलेस अटक केली आहे. अटक केलेल्या शबाना हिला बुधवारी मोेरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. यापूर्वी रवींद्र सिरसाम, सोनम पवार आणि माया सावंत या तिघांना अटक केली होती. तर अनिता जाधव आणि माया ओव्हाळ या दोघी फरार असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत. याप्रकरणी एका तीस वर्षीय तरुणाने भोसरी पोलिस ठाण्यात 8 जुलै 2017 रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत तरुणाला एका महिलेने फोन करुन संपर्क साधला. त्याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्याला भोसरी येथील वनराज लॉज येथे बोलावून घेतले. त्यानंतर ‘त्या’ महिलेने पीडित तरुणासोबत शारीरिक संबंध केले. तेथून दोघे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले. त्यावेळी त्या महिलेने तिच्या इतर साथीदारांना तेथे बोलावून घेतले.  तेथून त्याला जबरदस्तीने इंडिका कारमध्ये घालून भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाच्या बाजूच्या मैदानात नेले. तेथे त्या पीडित तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या खिशातील सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

अटक केलेल्या आणि फरार असणार्‍यांची एक टोळी असून त्यांच्यावर अशा प्रकारचे देहूरोड, कोंढवा, बंडगार्डन, वानवडी, येरवडा या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. यातील महिला अनोळखी क्रमांकावर मिस कॉल करतात किंवा फोन करुन संपर्क साधतात. समोरच्या पुरुषाला मादक बोलण्यातून घायळ करून आपल्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधतात. समोरच्याकडून पैसे उकळण्यासाठी तुझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार, समाजात सांगणात अशी भीती दाखवतात. पुरुष स्वतःच्या अब्रुसाठी लाखो रुपये या टोळीला देतात. तपास भोसरी पोलिस करत आहेत.

Tags : Pune, Stuck, woman, blackmailed,  youth