Wed, Jan 23, 2019 19:56होमपेज › Pune › डाळिंब व्यापारावरून संघर्ष पेटणार

डाळिंब व्यापारावरून संघर्ष पेटणार

Published On: Jul 10 2018 1:29AM | Last Updated: Jul 10 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

मार्केटयार्डातील कांदा-बटाटा व लसूण विभागात दररोजची आवक वाढली आहे. दरम्यान, विभागात यापुर्वी उभारण्यात आलेल्या डाळींबाच्या अनधिकृत शेडमध्ये डाळिंब व्यापार्‍यांना समान जागा वाटपात बाजार समिती प्रशासनाला अपयश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणीच डाळींब व्यापार्‍यांकडून समान जागेची मागणी होती आहे. त्यामुळे, येत्या आठ दिवसांमध्ये बाजार समितीने कांदा बटाटा विभागातील डाळिंब व्यापाराला पर्यायी जागा द्यावी अन्यथा 16 जुलै पासून कांदा बटाटा व लसूण विभाग बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा श्री छत्रपती आडते असोसिएशनने दिला आहे. 

डाळिंबाचा वाढता व्यापार लक्षात गेल्या काही वर्षापुर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेने गेट क्रमांक चार लगत सुमारे 30 गुंठे मोकळ्या जागेत डाळिंब यार्ड उभारले. आत्तापर्यंत त्यात फक्त चार आडतेच डाळिंबाचा व्यापार करत आहेत. संबंधित आडत्यांनी स्वतः जागेचे वाटप करून आपली मक्तेदारी निर्माण केली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून फळबाजारातील इतर आडत्यांकडेही डाळिंबाची आवक वाढल्याने त्यांनाही अतिरिक्त जागेची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे मागील चार-पाच वर्षापासून संबंधित डाळिंब आडते अतिरिक्त जागेची मागणी करत आहेत.

मात्र, त्यांना जागा देण्याच्या निर्णयावर तोडगा काढण्यात बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले. बाजार समितीकडून कोणतीही ठोस भुमिका घेण्यात आली नाही. त्यातच कांदा-बटाटा विभागात एक अनधिकृत शेड उभे राहिले. कांदा बटाटा व लसूण विभागात रोज आवक वाढत असताना अनधिकृत शेडवर कारवाई होत नसल्यामुळे या विभागातील व्यापाछयांना व्यापार करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीने येत्या आठ दिवसात कांदा बटाटा विभागातील डाळिंब व्यापार न हटविल्यास 16 जुलै पासून कांदा बटाटा व लसूण विभाग बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय आडते असोसिएशनने आज झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.