Wed, Nov 13, 2019 12:09होमपेज › Pune › भर रस्त्यात तिघांची तरूणीला मारहाण

भर रस्त्यात तिघांची तरूणीला मारहाण

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 1:00AM

बुकमार्क करा

 पुणे : प्रतिनिधी 

भररस्त्यावर एका तरुणीचा विनयभंग करत दोन तरुणांनी तिला मारहाण केल्याची घटना चंदननगर परिसरात नगर रस्त्यावरील पाचवा मैल परिसरात उप्पाला हॉटेलसमोर रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.  मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चंदननगर पोलिसांनी शोधाशोध करून बुधवारी दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.
येरवडा येथील एका तरुणीने याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकजण  वाघोली येथील असून, दुसरा जामखेड येथील आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही चंदननगर येथील पाचवा मैल परिसरातील नगर रस्त्यावर असलेल्या हॉटेल उप्पलजवळून रविवारी रात्री नऊच्या सुमारास जात होती. त्या वेळी तेथे ती एका ओळखीच्या मुलाशी बोलत होती. तर व्हीडीओत तिचा विनयभंग करताना दिसत असलेले तरुण मद्यधुंद अवस्थेत तेथे होते. त्यांनी तिला पाहिले आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्यांच्याशी बोलली नाही. ती बोलत असलेला तरुण तिचा मित्र आहे हे त्यांना माहीत होते. दरम्यान त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला व काही अंतरावर गेल्यावर तिला अडवले. ती बोलत नसल्याचे पाहून त्यांनी तिला अश्‍लील शब्दात शिवीगाळ केली. त्यानंतर तिचा विनयभंग केला. तर तिचा मित्र त्या दोघांपासून तिला वाचविण्याचा प्रयत्न करत होता. त्या वेळी तेथील एका व्यक्तीने या सर्व प्रकाराचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी तरुणीचा व व्हिडीओतील तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तरुणीचा शोध घेऊन तिला मदत करणार्‍या तरुणाचादेखील शोध घेतला. त्यानंतर व्हिडीओतील तरुणांची ओळख पटली असून, आम्ही तिला तक्रार करण्यास सांगितले आणि  तिने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर भादंवि 354, 506, 509, 323 या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.  त्यातील एक तरुण हा वाघोली येथील राहणारा असून, दुसरा तरुण हा जामखेड येथील असल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांची दोन पथके त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिली.