Wed, Mar 27, 2019 04:25होमपेज › Pune › सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार

सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार

Published On: Jul 13 2018 1:14AM | Last Updated: Jul 13 2018 12:50AMपुणे : प्रतिनिधी 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे पुलांची पाहणी केली असून, पुढील 5-6 दिवसात सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा एकदा करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी गुरुवारी दिली.  मुंबईतील पूल दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’ने पुण्यातील रेल्वे पुलांची पाहणी करून ‘पुण्यातील रेल्वे पूल सुरक्षित आहेत का?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून धोक्याचा इशारा दिला होता. दरम्यान, पुणे विभागातील विविध कामांचा आढावा तसेच कोणती कामे प्रगतीपथावर आहेत, याबाबत माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. 

देऊस्कर म्हणाले,  पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसर्‍या, चौथ्या ट्रॅकचे काम सुरू होण्यास विलंब लागणार असून, पुढील दोन महिन्यात तपशीलवार प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर केला जाणार आहे. या मार्गावरील अतिक्रमणांचा मुद्दा गंभीर असून, त्यांना हटविण्याचे काम कठीण आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लागत असून, पुणे विभागात एकूण 10 हजार अतिक्रमणे रेल्वे मार्गालगत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बारामती -फलटण लोहमार्ग रखडलाच असून, अद्यापही सात गावांचा मोजमाप शिल्लकच आहे. पुणे ते दौंड स्थानकांदरम्यान ज्या-ज्या स्थानकांवर पादचारी पूल नाहीत, तिथे-तिथे ते बांधले जातील. खुटबाव, कडेठाण येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, मांजरी बुद्रुकचा प्लॅटफॉर्म उंच होण्यास अजून पाच महिन्यांचा कालावधी लागेल. पुणे विभागात महामार्गालत रोपे लावण्याचे काम प्रगतीपथावर असून, पर्यावरणास हातभार लावण्याचा विडा आम्ही उचलला आहे. येत्या 2-3 दिवसात पुणे स्टेशनवर प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिन दाखल होणार आहे. वॉटर व्हेंडिंगच्या संख्येत वाढ करण्याचा विचार आहे. पुणे यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू असून, स्थानिक स्वराज्य संस्थांचे तत्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. त्यांनी पुढाकार घेतलल्यास काम लवकर पूर्ण होईल. याकामाकरिता सध्या निधीचा तुटवडा जाणवत आहे. पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 4, 5, 6 ची लांबी वाढविण्याचे काम सुरू असून लवकरच ते 24 कोचच्या गाड्या मावतील असे करण्यात येतील, असेही देऊस्कर म्हणाले. 

पादचारी पूल ऑगस्ट अखेर खुला

पुणे स्टेशनवरील सर्व पुलांना जोडण्यात येणार्‍या पादचारी पुलाचे काम सध्या सुरू असून, ऑगस्ट अखेर तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. एकूण पाच ठिकाणी सरकते जिने बसविण्यात येतील. प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळेच वारंवार ब्लॉक घेण्यात येत असून, मध्यंतरी पुणे रेल्वे स्थानकावर पुलाच्या गर्डरच्या कामाकरिता ब्लॉक घेण्यात आला होता.