Sun, May 19, 2019 22:35होमपेज › Pune › पक्षवाढीसाठी चांगली माणसे घ्यावीच लागतील 

पक्षवाढीसाठी चांगली माणसे घ्यावीच लागतील 

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 12:47AMपिंपरी : प्रतिनिधी 

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सेनेत तिकिटासाठी इच्छुकांच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यापुढे काहीसे आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच सेनेतील आ. चाबुकस्वार समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्वतः आ. चाबुकस्वार यांनी आपली अस्वस्थता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; तसेच खासदार व विभागीय संपर्क नेते संजय राऊत यांच्याकडे बोलून दाखवल्याचे समजते; मात्र दोघांनीही तिकिटाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, पक्षवाढीसाठी चांगली माणसे घ्यावीच लागतील, असे सांगून चाबुकस्वारांची समजूत घातल्याचे सूत्रांनी सांगितले.

सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खा. श्रीरंग बारणे यांनी चाबुकस्वार यांचा काँग्रेसमधून सेनेत प्रवेश घडवून आणला. चाबुकस्वार यांना विधानसभेची उमेदवारीही मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांना फाजील आत्मविश्वास नडला. राज्यात आघाडी सरकारच्या विरोधात असंतोष असला, तरी आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना भाजपचे कमळ हे नसलेले चिन्ह, सोनकांबळे व शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्यात होणारी मतविभागणी आपल्या पथ्यावर पडेल, अशी आशा बनसोडे बाळगून होते; मात्र त्यांना चाबुकस्वार यांच्याकडून अवघ्या 2 हजार 235 मतांनी पराभूत व्हावे लागले. चाबुकस्वारांना 51 हजार 96, तर अण्णा बनसोडे यांना 48 हजार 761 मते मिळाली. सोनकांबळे यांना 47 हजार 288 मते मिळाली.

शांत, निरुपद्रवी या चाबुकस्वार यांच्या जमेच्या बाजू असल्या, तरी त्यांच्या कार्यपद्धतीवर शिवसैनिक नाराज आहेत. शिवसेनेच्या वतीने आयोजित पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसंपर्क अभियानात निरीक्षक व संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांच्यासमोर शिवसैनिकांनी चाबुकस्वार यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. आमदार चाबुकस्वार हे काँग्रेसच्याच गराड्यात असतात. छोट्या-छोट्या शासकीय कमिट्या, विशेष कार्यकारी अधिकारी पदावरही शिवसैनिकांना संधी दिली गेली नाही.

जवळच्यांनाच चाबुकस्वार यांनी पदे वाटली, असा आरोप शिवसैनिकांनी केला. महापालिका निवडणुकीत बाहेरून आलेल्यांना आपण तिकिटे दिली. ती माणसे आज सेनेत काम करताना दिसत नाहीत.  निवडणुका आल्या की, शिवसैनिकांना कामाला लावले जाते, त्यांची एरवी आठवण होत नाही, अशा संतप्त भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. निरीक्षक संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांनी ‘विधानसभा निवडणुकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केली आहे. 150 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला सारून कामाला लागा,’ असे आवाहन करत कार्यकर्त्यांची समजूत घातली.

याच दरम्यान पिंपरीतील संत तुकारामनगर येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठीची सेनेची ही पर्यायी व्यवस्था असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याबाबत ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त दिल्यानंतर चाबुकस्वार समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली. खा. संजय राऊत शनिवारी पिंपरीत आले असता त्यांच्याकडे; तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चाबुकस्वारांनी ही अस्वस्थता व्यक्त केली. राऊत यांनी सेनेचे मुखपत्र सामनात आपणही बातम्या देत असतो. पत्रकार विश्लेषण करतच असतात. तुम्हाला ननावरे यांच्या प्रवेशाच्या वेळी बोलावले होते तेव्हा तुम्ही आला नाहीत. तिकिटाचे काही निश्चित केले नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. 

उद्धव ठाकरे यांनीही चांगली माणसे सेनेत यायला हवीत. आल्यावर त्यांना बळ द्यायला हवे, असे सांगितले; मात्र तिकिटाबाबत अजून काही निर्णय झालेला नाही. काम करत राहा, असा सल्ला ठाकरे यांनी आ. चाबुकस्वार यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.