होमपेज › Pune › माजी आमदार-माजी नगरसेवक भिडले

माजी आमदार-माजी नगरसेवक भिडले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी विविध प्रश्नांवर काढलेल्या मोर्चात एकमेकांकडे बघण्यावरून माजी आ. अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्यात जोरदार वादावादी झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास चापेकर चौकात हा प्रकार घडला. दोघेही चिंचवड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी आलेले होते, मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण आपसात मिटवले.

आमची काहीच तक्रार नाही 

राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्यात हमरीतुमरी झाल्यानंतर ते पोलिस चौकीत पोहोचले. पण नंतर आपापसांत तडजोड करून ‘आमची काहीच तक्रार नाही’, असे म्हणत त्यांनी काढता पाय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्राधिकरण नवनगरच्या कार्यालयावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चास बनसोडे आणि पवार हे दोघे स्वतः व त्यांचे कार्यकर्ते घेऊन गेले होते. मोर्चा सुरू असताना दोघांमध्ये एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला. यावरून चापेकर चौकात दोघे एकमेकांना भिडले आणि हमरीतुमरी झाली.

मोर्चा संपवून परत जात असताना बनसोडे यांची गाडी पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्यात आली. त्यानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचेे  नुकसान करण्यात आले. तसेच दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तर पवार हे जात असताना बनसोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली. पिस्तूल दाखवून धमकी देत वादावादी केली,  असे आरोप दोघांनी एकमेकांवर केले. 

चापेकर चौकात वाद झाल्याने दोघेही समर्थकांसह चिंचवड पोलिस ठाण्यात दाखल झाले. दोघांमध्ये झालेला वाद वरिष्ठ नेत्यांना समजताच सर्वांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. माजी आमदार विलास लांडे, शहरप्रमुख संजोग वाघेरे, माजी, आजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले. नेत्यांनी दोघांशी बातचीत करून हे प्रकरण आपसात मिटवले.