Tue, Nov 13, 2018 01:29होमपेज › Pune › ‘अ‍ॅक्वा योगा’च्या प्रात्यक्षिकांतून सशक्त भारताचा संदेश

‘अ‍ॅक्वा योगा’च्या प्रात्यक्षिकांतून सशक्त भारताचा संदेश

Published On: Jun 21 2018 1:23AM | Last Updated: Jun 21 2018 12:38AMपुणे ः प्रतिनिधी

ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करुन योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहिल आणि निरोगी समाजनिर्मिती होईल, असे सांगत पुण्यातील तब्बल 100 शालेय विद्यार्थ्यांनी देखील तलावाबाहेर ही आसने घालून जागतिक योग दिन साजरा केला. 

श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक योग दिनानिमित्त इन्स्टिटयूट ऑफ योगा पुणे संस्थेतील युवतींनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील नांदे तलावात योगासनांचे सादरीकरण केले. चैताली ठोंबरे, निधी घोरपडे, लौकीका माळगे, मनिषा कर्डीले या युवतींनी पाण्यामध्ये योगासने सादर केली. 

यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, विनय मराठे, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, निलीमा खाडे, मानसी देशपांडे, अ‍ॅड. मिलींद पवार, आनंद रेखी, आयोजक प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर, मनिषा खेडेकर, योगाचार्य विदुला शेंडे, विश्वास शेंडे, संगीता लकारे उपस्थित होते. 

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी फोनद्वारे उपस्थितांशी संवाद साधून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. खेडेकर म्हणाले, ताण-तणाव आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात योग करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी दशेपासूनच योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगासने करावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पाण्यामध्ये आसने करणे अवघड असते, हा प्रकार परदेशात प्रचलित आहे. पुण्यामध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला.

शेंडे म्हणाल्या, डोक्यापासून ते पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला योगासनांमुळे व्यायाम मिळतो. पाण्यामध्ये केलेला ‘अ‍ॅक्वा योगा’ हा वेगळ्या प्रकारचा व्यायामप्रकार आहे. पाण्यातील लहरींशी झुंज देत ही योगासने केली जात असल्याने शरीराला अधिक व्यायाम मिळतो. इन्स्टिटयूट ऑफ योगा पुणे संस्थेमध्ये अ‍ॅक्वा योगाचे धडे दिले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.