Wed, May 22, 2019 22:21होमपेज › Pune › सराईतांना ‘एमपीडीए’ कारवाईचा धाक

सराईतांना ‘एमपीडीए’ कारवाईचा धाक

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 1:31AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. झोपडपट्टीदादा निर्मूलन (एमपीडीए- महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी अ‍ॅक्ट) कायद्यानुसार मागील पाच वर्षांत 78 गुन्हेगारांना स्थानबद्ध करून थेट तुरुंगाची हवा दाखविण्यात आली आहे. 2017 मध्ये सर्वाधिक 30, तर 2018 मध्ये आतापर्यंत 3 सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार व गुंडांना या कारवाईचा चांगलाच धसका बसला आहे. 
शहरात वारंवार नागरिकांना मारहाण करणे, खून, खंडणी, शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडणे, जाळपोळ, तोडफोड, हातभट्टी दारू विकणे, तसेच अवैध धंदे बळाच्या जोरावर चालविण्यासारखे गंभीर गुन्हे गुंड व गुन्हेगारांकडून केले जातात; त्यामुळे त्यांची नागरिकांमध्ये दहशत असते. अशा वेळी नागरिकही त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न पोलिस आणि प्रशाससनापुढे निर्माण होतो. त्यामुळे अशा गुंड व गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी व त्यांना वचक बसविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. प्रथम गुन्हेगारांना पोलिसांकडून त्यांच्या कारवायांवर अंकुश आणण्यासाठी  शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. मागील चार वर्षांत 780 सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून वेगवेगळ्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले. मात्र तडीपारीच्या प्रतिबंधात्मक उपायानंतरही त्यांची गुन्हेगारी कृत्ये थांबविण्यासाठी तसेच त्यांचे संपूर्ण गुन्हेगारी वलय नष्ट करण्याच्या प्रयत्नातील पुढचा टप्पा ही  एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धची कारवाई होय. पुणे शहर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मागील दोन वर्षांत अशा प्रकारे गंभीर गुन्ह्यात सहभागी असणार्‍या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा धडाका लावला.  वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून गुन्हेगारांची कुंडलीच तयार करण्यात आली. यानंतर त्यांच्यामार्फत या गुन्हेगारांना एमपीडीएअंतर्गत राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे पाठविण्यात आले. पुणे शहर पोलिस आयुक्तांनी 2013 साली 2 तर 2014 मध्ये 11, 2015 मध्ये 10, 2016 मध्ये 25, 2017 मध्ये 30 सराईत गुन्हेगार व गुंडांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एकूण 78 सराईतांची रवानगी थेट कारागृहात करण्यात आली. त्यामुळे वारंवार गंभीर गुन्हे करणार्‍या तसेच कायदा व सुव्यवस्थेवर घाला आणणार्‍या सराईतांना कारवाईचा वचक बसला आहे. कारण एक किंवा दोन वर्षांपर्यंत त्यांना कारागृहात स्थानबद्ध केल्याने त्यांच्या शहरातील संपूर्ण दहशतीला विराम बसतो.
काय आहे एमपीडीए कायदा?
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.  परंतु कारवाईनंतर त्याला पोलिस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते.