Tue, Jul 23, 2019 01:57होमपेज › Pune › ‘एमपीएससी’ परीक्षेत गैरप्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई

‘एमपीएससी’ परीक्षेत गैरप्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 12:14AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणार्‍या स्पर्धा परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसवून मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. दरम्यान, ज्या शासकीय पदाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून गैरप्रकार झाला, त्या निवड प्रक्रियांशी एमपीएससीचा संबंध नसून, याबाबत अटक करण्यात आलेले 15 पैकी 14 उमेदवार जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेतील आहेत; तर एक उमेदवार आयोगाच्या लिपिक-टंकलेखक परीक्षेशी संबंधित आहे. 

आयोगाद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे शनिवारी स्पष्ट करण्यात आले. राज्यात एमपीएससीची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चे काढत आपला रोष व्यक्त केला होता. 

या  मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी, तामिळनाडू पॅटर्न राबवावा, परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआयमार्फत करण्यात यावी, राज्य आणि जिल्हा पातळीवरील रिक्त जागा भरण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावर एमपीएससी आयोगाने शनिवारी स्पष्टीकरण दिले. डमी उमेदवार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दोषींना काळ्या यादीत टाकणे, आयोगाच्या सर्व परीक्षांना बसण्यावर त्यांना बंदी; तसेच शिफारस झाली असल्यास शिफारस रोखून, कारवाई करण्यात येणार आहे; तसेच त्यांच्या निलंबनाबाबत शासन विभागास कळविण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलिस उप-निरीक्षक आणि  विक्रीकर निरीक्षक पदासांठीची संयुक्त स्पर्धा परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. 

दरम्यान, या पदासांठी पूर्वीही संयुक्त परीक्षा होत होती. मात्र, पोलिस उप-निरीक्षक पदभरतीसंदर्भात न्यायालयीन प्रकरण विलंबामुळे काही कालावधीसाठी ही परीक्षा स्वतंत्र घेण्यात आली. उमेदवारांच्या वेळेची व खर्चाची बचत, तसेच परीक्षेच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी, तसेच परीक्षांचा अभ्यासक्रम आदी बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या पदासांठी संयंक्त परीक्षाच उमेदवारांच्या हिताची असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. 

त्याचबरोबर एमपीएससीने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी या मागणीवर आयोगाने 11 मार्च रोजी झालेल्या लघुलेखक परीक्षेत नेहमीच्या हजेरीव्यतिरिक्त बायो-मॅट्रिक हजेरीची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू केल्याचे स्पष्ट केले. तसेच आतापर्यंत सुमारे 7 लाख उमेदवारांनी आधार कार्ड नोंदणी केली असून, आधार नंबर नोंदणीची अंतिम मुदत दिली आहे. परीक्षांदरम्यान मोबाईल जॅमरचा वापर सुरू केल्याचेही आयोगान स्पष्ट केले.

तामिळनाडू पॅटर्न व्यवहार्य नसल्याने लागू करण्यास नकार दिला आहे; तर यापुढे परीक्षेत गैरप्रकार करण़ार्‍यांना काळ्या यादीत टाकत ती यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचा सी-सॅटचा पेपर केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याच्या मागणीवर, शासनाच्या महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवारांची आकलनशक्ती, समज, विश्‍लेषण, आकलनचा वेेग, सूक्ष्म निरीक्षणे आदी गुणांचे परीक्षण होणे आवश्यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.