Fri, May 24, 2019 21:26होमपेज › Pune › राजभवनातून चंदनाची झाडे चोरीला

राजभवनातून चंदनाची झाडे चोरीला

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या समोरच असणार्‍या राज्यपाल्यांच्या निवासस्थानातूनच चंदनाची चार झाडे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे याठिकाणी कडेकोट सुरक्षा असताना देखील चोरट्यांनी ही सुरक्षा भेदून चंदनचोरी केल्याने येथील सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यातही शहरातील चंदन चोरांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत असून, चोरटे बहुतांश सुरक्षेची ठिकाणे समजल्या जाणार्‍या ठिकाणांवरच डल्ला मारत आहेत. 

याप्रकरणी दिनेश कालिदास देशपांडे (वय 37, रा. राजभवन) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशपांडे हे राजभवन निवास्थानाचे अधिकारी आहेत. गणेश खिंड रोडवर राज्यपालाचे निवासस्थान म्हणून राजभवनाचा परिसर आहे. साधारण राजभवन हा 22 एकरचा परिसर आहे. याला तीन प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी पोलिस मुख्यालयातून सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते. त्यात विशेष म्हणजे, राजभवनापासून काही मीटर अंतरावर चतुःशृंगी पोलिस ठाणे आहे. एका बाजूला राजभवन आणि दुसर्‍या बाजूला पोलिस ठाणे आहे. हा रस्ता कायम वर्दळीचा असतो. दरम्यान सोमवारी (30 एप्रिल रोजी) रात्री साडेअकरा ते मंगळवारी सकाळी नऊ दरम्यान राजभवनातील चार चंदनाची झाडे तोडून नेल्याचे आढळून आले. या चार चंदनाच्या झाडांची किंमत साधारण चाळीस हजार रूपये आहे. राजभवनाचे अधिकारी देशपांडे यांना हा प्रकार समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी राजभवनातील चार झाडे कटरच्या सहाय्याने तोडून नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची दोन पथके आरोपींचा माग काढत आहेत. मात्र, या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्यामुळे अडचणी येत असून, सीसीटीव्हीचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, तो प्रलंबित असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

राजभवन परिसर अतिसुरक्षित म्हणून ओळखला जातो. पाच वषार्र्ंपूर्वीही देखील चंदन चोरीच्या घटना घडल्या आहेत. जून 2013 मध्ये राजभवन परिसरातून चंदनाची तीन झाडे चोरीला गेली होती. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एका टोळीला अटक केली होती. पण, पुन्हा या ठिकाणाहून पुन्हा चंदनाची झाडे चोरीला गेल्यामुळे राजभवनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटना घडल्या त्या दिवशी तीन प्रवेशद्वारापैकी एकाच प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात होते. त्यामुळे आतील भागात सुरक्षाव्यवस्था का नव्हती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags : Pune, Stolen, sandalwood, trees,  Raj Bhavan