Tue, Apr 23, 2019 06:20होमपेज › Pune › काश्मिरात पकडलेल्या तरुणीबाबत संभ्रम

काश्मिरात पकडलेल्या तरुणीबाबत संभ्रम

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:37AMपुणे : प्रतिनिधी 

काश्मीरमध्ये घातपात घडवून आणण्याच्या शक्यतेतून पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पकडलेल्या पुण्यातील तरुणीबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. पोलिसांनी पकडलेली मुलगी माझी मुलगी आहे, हे प्रत्यक्ष तिला पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही़  पकडलेली तरुणी माझी मुलगी आहे. यावर माझा अजून विश्‍वास नाही, असे संबंधित तरुणीच्या आईचे म्हणणे आहे. तर, जम्मू-काश्मीर पोलिसांनी 25 जानेवारीच्या रात्री दक्षिण काश्मीरमधून या तरुणीला पकडले असून, ती आत्मघातकी बॉम्बर असल्याची गुप्तचर यंत्रणांंकडून पोलिसांना सांगण्यात आले होते.

तर, तिची चौकशी करण्यात येत असून, शनिवारी जम्मू पोलिस अधिकार्‍यांशी तिच्या आईचे बोलणे झाले़  तिच्या कुटुंबीयांना काश्मीरमध्ये बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते़ ‘इसिस’च्या आत्मघातकी बॉम्बर महिला काश्मीर खोर्‍यात शिरल्या असून, त्यात पुण्यातील तरुणीचा सहभाग आहे. तर, त्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घुसून बॉम्बस्फोट करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर पोलिसांना दिल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु, प्रजासत्ताक दिनाच्या आदल्याच रात्री दक्षिण काश्मीरमधून या तरुणीला ताब्यात घेण्यात आले होते़ 

पुणे पोलिसांना यापूर्वी याबाबत माहिती देण्यात आली होती.  येरवडा येथे राहणार्‍या तिच्या आईकडे चौकशीही केली होती. तर, तिला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर तिला शिक्षणासाठी आम्ही बाहेरगावी पाठविले आहे़  काश्मीरमधील पोलिसांनी तिला पकडल्याचे सांगितले जाते, मात्र त्यावर माझा विश्‍वास नाही़  तिच्याशी प्रत्यक्ष बोलणे किंवा भेट झाल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. तिला शिक्षणासाठी आम्ही कोठे पाठविले आहे, हेही सांगू शकत नाही, असेही तिच्या आईने पोलिसांना सांगितले़  तसेच अधिक काही बोलण्यास तिने नकार दिला.

सर्व यंत्रणाकडून तपास सुरू

जम्मू-काश्मीर पोलिसांनी हायअ‍ॅलर्ट जारी केल्यापासून पुणे पोलिसांनी तिच्या आईची चौकशी केली आहे. त्यात तिच्या आईने काश्मीरमध्ये पकडलेली मुलगी तिची नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुणे पोलिसांकडूनही याबाबत तपास सुरूच आहे. त्यासोबतच एटीएस आणि आयबीच्या अधिकार्‍यांकडून याबाबत तपास चालू आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.