Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Pune › स्टिरॉईड्स ठरत आहेत त्वचारोगासाठी निमंत्रण

स्टिरॉईड्स ठरत आहेत त्वचारोगासाठी निमंत्रण

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:43PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

जनरल प्रॅक्टिशनर्सकडून त्वचाविकाराचे योग्य ते निदान न करता स्टिरॉईड्स आणि इतर औषधे रुग्णांना सुचविल्यामुळे आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या परस्पर औषधे घेतल्याने त्वचारोग वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्वचाविकार झालेल्या रुग्णांनी त्वचाविकार तज्ज्ञांकडे जाऊनच उपचार घ्यावेत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

सध्या त्वचाविकाराचे रुग्ण वाढले असून ससून रुग्णालयात दररोज अडीचशे ते तीनशे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यामध्ये विविध त्वचाविकार, वांग येणे, फंगल इन्फेक्शन तसेच औषधे आणि स्टिरॉईड्स घेऊन त्वचेवर गंभीर परिणाम झालेल्या रुग्णांचीही संख्या मोठी आहे. सध्या बाजारात त्वचाविकारावरील औषधांची व्यावसायिक दृष्टीने जाहिरात केली जाते. त्यामुळे नागरिकदेखील डॉक्टरांचा सल्‍ला न घेता मेडिकलमधून परस्पर ही औषधे घेतात. यामुळेदेखील हे प्रमाण वाढले आहे. 

सुरुवातीला कोणताही त्वचाविकार झाल्यानंतर रुग्ण प्रथम जवळच्या जनरल प्रॅक्टिशनर्सला दाखवतात. यावेळी जनरल प्रॅक्टिशनर्स त्यांना मेडिकलमध्ये सर्वसाधारणपणे मिश्र औषधांचे घटक असलेली औषधे देतात. ज्यामध्ये स्टिरॉईडसह विविध स्वरूपाच्या औैषधांचे मिश्रण असते. यातील एक घटक उपयोगी येतो, पण इतर तीन घटक हे गरज नसतानाही त्वचेला लावल्याने त्याचे साईड इफेक्टही त्वचेवर लगेच नव्हे तर कालांतराने दिसू लागतात. यामध्ये त्वचा काळी पडणे किंवा खाज येणे असे परिणाम दिसून येतात; जे कोणत्याच औषधाला दाद देत नाही. अशी परिस्थिती उद्भवल्यानंतरच रुग्ण हे त्वचाविकारतज्ज्ञांना दाखवतात.

जर सुरवातीलाच त्वचेचा कोणताही विकार असेल आणि त्वचाविकारतज्ज्ञाचा सल्‍ला घेतला तर तो डॉक्टर हा सुरवातीपासूनच योग्य उपचार देण्यास सुरुवात करतो. यामध्ये हा आजार कशामुळे उद्भवला याचे निदान करून त्यावर उपचार सुरू करतो. कारण कोणतेही सर्वसाधारण औषध न देता योग्य ते औषध सुरू करतो. यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होतो, अशी माहिती ससून रूग्णालयाचे त्वचाविकार तज्ज्ञ आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल गोसावी यांनी दिली.