पिंपरी : प्रतिनिधी
शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण दिेवसेंदिवस वाढत आहे. गल्ली बोळातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतुकीवरचा बोजा कमी व्हावा व वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी शहरात उड्डाणपूलांची उभारणी करण्यात आली. परंतु, याच उड्डाणपूलांखाली वाहनधारकांचा बेशिस्तपणा दिसून येत आहे. शहरातील वाहनधारक दिवसेंदिवस कितीही सुविधा पुरवा आम्ही सगळे नियम तोडणारच या उद्देशाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहेत. उड्डाणपुलाखालीही वाहनांचेच साम्राज्य दिसून येत आहे.
एकीकडे पार्कींगबाबत नवीन नियम तयार होत असताना दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांना या नियमांचे काहीही सोयरसुतक नसल्याचाच भास या उड्डाणपुलांकडे पाहून होत आहे. शहरातील पुलांखाली वाहनांचा ठिय्या मांडला आहे. भोसरी, चापेकर चौक, डांगे चौक, तसेच चिंचवडमधील जुना जकात नाका येथील उड्डाणपूलाखाली वाहनधारक सर्रास वाहने पार्क करुन निघून जात आहेत. त्यामुळे येथे अनेकदा वाहतूक कोंडी होते. निगडी उड्डाणपूलाखाली तसेच कासारवाडी येथील उड्डाणपूलाखालीही हेच चित्र दिसून येत आहे.
उड्डाणपूल बनले पार्किंग स्टँड
उड्डाणपूलाखाली नो पार्कींगचे फलक लावले असतानाही याठिकाणीसर्रास वाहने पार्क करण्यात येत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येऊनही येथे सर्रास पार्कींग करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवकही याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उड्डाणपुलाखाली वाहने उभी केल्यामुळे येथील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. येथे एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न केला जात आहे.
बॅनरबाजीसाठी हक्काचे ठिकाण
संपूर्ण शहरात सर्वत्र अनधिकृत फ्लेक्सचे पेव फुटले असून उड्डाणपूल हे सुध्दा आता जाहीरातबाजीचे ठिकाण बनले आहेत. भोसरी परिसरात हे प्रमाण अधिक आहे. भोसरी उड्डाणपूल म्हणजे जाहिरात बाजीसाठी हक्काची जागा बनली आहे. अनेक खासगी जाहिरातींचे बॅनर पुलाच्या पिलरला लावण्यात आले असून या विद्रुपीकरणाकडे कोणी लक्ष देईल का, असा सवाल नागरीक करत आहेत.