Tue, May 21, 2019 04:25होमपेज › Pune › कोल्हापुरातून होणार दौर्‍याला सुरुवात

सुकाणू समितीचे १६ पासून राज्यभर दौरे

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करूनही शेतीमालास मिळत नसलेला हमीभाव, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आणि सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी उठविण्याच्या मागण्यांवर शेतकर्‍यांची सुकाणू समिती ठाम आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर येथून 16 फेब्रुवारीपासून राज्यभर दौरा करण्याचा निर्णय सुकाणू समितीने रविवारी येथे घेतला आहे.

पुणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील शेतकरी निवासात सुकाणू समिती सदस्यांची बैठक सायंकाळी झाली. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, हमाल पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, कालिदास आपेट, किशोर ढमाले, राजाभाऊ देशमुख, सुशीला मोराळे, बाळू पठारे, विठ्ठल पवार, प्रतिभा शिंदे, सुभाष काकुस्ते, सचिन धांडे, शिवाजी नांदखिले आदींसह समितीचे अन्य सदस्य व 150 ते 200 शेतकरी उपस्थित होते.

बैठकीनंतर दै. ‘पुढारी’शी बोलताना कालिदास आपेट म्हणाले की, कोल्हापुरातील शाहू स्मारकपासून 16 फेब्रुवारीस दौर्‍याला सुरुवात होईल. तेथून सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलडाणा, जालना आणि 24 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद याप्रमाणे समितीचा दौरा होईल. प्रत्येक जिल्हानिहाय शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांचा ऊहापोह तेथे होणार आहे. 25 व 26 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील चाकण येथील दौंडकर वस्तीवर सुकाणू समितीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होणार आहे.

शेतकर्‍यांचे 30 एप्रिलला ‘जेल भरो’ आंदोलन

यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी साहेबराव कर्पे-पाटील ते धर्मा पाटील आदींसह विविध आंदोलनांमध्ये हौतात्म्य आलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुकाणू समितीसह शेतकर्‍यांकडून 19 मार्चला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व अन्‍नदात्याच्या हक्‍कासाठी एक दिवस अन्‍नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 23 मार्च रोजी हुतात्मा अभिवादन यात्रेची सुरुवात इस्लामपूर (जि. सांगली) येथून होईल. राज्यभर ही यात्रा होणार आहे. त्यामध्ये संयुक्‍त महाराष्ट्रातील हुतात्मे, हैदराबाद-गोवामुक्‍ती संग्रामातील हुतात्मे, शेतकरी आंदोलनामधील हुतात्मे, पवना धरणग्रस्त हुतात्मे आदींना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक शासनाकडून न झाल्यास 30 एप्रिल रोजी राज्यभर शेतकर्‍यांचे ‘जेल भरो’ आंदोलन आयोजित करण्यात आल्याचेही आपेट यांनी सांगितले.