Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Pune › 'कायद्याच्या राज्यापेक्षा न्यायाचे राज्य महत्त्वाचे'

'कायद्याच्या राज्यापेक्षा न्यायाचे राज्य महत्त्वाचे'

Published On: Sep 08 2018 2:55PM | Last Updated: Sep 08 2018 6:45PMपुणे : प्रतिनिधी 

संविधानाने दिलेले अधिकार व हक्क लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहेत. लोकशाहीच्या परिघात एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण नेहमीच सजग असले पाहिजे. आपण लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात राहत आहोत. आपली लोकशाही न्यायाचे राज्य या संकल्पनेने संरक्षित आहे. जर न्यायाचे राज्य ही संकल्पना कोसळली तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही. न्याय हा शाश्वत आहे. कायदे काळानुसार बदलत असतात. त्यामुळे कायद्याच्या राज्यापेक्षाही न्यायाचे राज्य महत्वाचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी व्यक्त केले. 

भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डॉ. पतंगराव कदम स्मृती प्रबोधन व्याख्यानमालेचा शुभारंभ, तसेच न्यू लॉ कॉलेज विस्तारित कक्ष २ आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे उद्घाटन न्या. दीपक मिश्रा यांच्या हस्ते भारती विद्यापीठात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरु डॉ. विश्वजीत कदम, अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. मुकूंद सारडा आदी उपस्थित होते.

यावेळी न्या. दीपक मिश्रा पुढे म्हणाले, पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. पतंगरावांनी १९६४ मध्ये स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी ते आयुष्यभर झटत राहिले. कायद्याच्या नजरेतून एखादी गोष्ट चुकीची ठरविण्यापूर्वी तिच्याविषयी मनात आदर असणे महत्वाचे आहे. परस्परांविषयीचा आदर हा न्याय प्रक्रियेतला महत्वाचा टप्पा आहे, असेही न्या. मिश्रा यावेळी म्हणाले. 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची ओळख सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणारे राज्य म्हणून आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा लोकशाही राज्य व्यवस्थेचा मूळ उद्देशच आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या धुरीणांनी महाराष्ट्रात सामाजिक न्यायाचा पाया रचला. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे फडणवीस म्हणाले. 

डॉ. पतंगराव कदम यांचे व्यक्तीमत्व ग्रामीण बाज असलेले, उमदे व रांगडे होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव अशी प्रगती केली. त्यांनी गुणवत्तेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. सामान्य व वंचित घटकांतील लोकांसाठी ते शेवटपर्यंत काम करत राहिले. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
यावेळी न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती नरेश पाटील यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विश्वजीत कदम यांनी केले, तर प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी ‘द मेमरीज ऑफ डॉ. पतंगराव कदम’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या झाले. कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ, कायदेपंडित आणि तज्ज्ञ संशोधक, विद्याथी उपस्थित  होते.