Mon, May 27, 2019 00:46होमपेज › Pune › राज्यात धावणार एसटीच्या 'नॉन एसी' स्लीपर बस

राज्यात धावणार एसटीच्या 'नॉन एसी' स्लीपर बस

Published On: Apr 12 2018 9:03PM | Last Updated: Apr 12 2018 9:03PMपुणे: प्रतिनिधी 

नॉन एसी स्लीपर बसेसची नोंदणी आणि वाहतूक करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) शासनाकडून आधीच परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी केवळ एसटी महामंडळातील गाड्यांनाच देण्यात आली असून खासगी वाहनांना राज्यात नोंदणीची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतीत एसटीला एकाधिकार असून लोकांच्या सेवेत लवकरच एसटीच्या नॉन एसी स्लीपर बसेस दाखल होतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी दिली. राज्यात नॉन एसी स्लीपर बसेसच्या नोंदणीला संमती नाही. परंतु, एसटीच्या बाबतीत मात्र ही अट शिथील करण्यात आली असून शासनाने महामंडळास यासंदर्भातील नियमामध्ये सूट दिली आहे. 

परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, महामंडळामार्फत लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात राज्यभर चालविल्या जातात. लोक रात्री-अपरात्री प्रवास करण्यास एसटीच्या गाड्यांनाच प्राधान्य देतात. सध्या असलेल्या बहुतांश गाड्यांमधून बसून प्रवास करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी ते गैरसोयीचे ठरते. त्यामुळे एसटीमध्ये स्लीपर कोच गाड्या आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

त्यानुसार काही एसी स्लीपर बसेस ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने नॉन एसी स्लीपर बसेस एसटीच्या ताफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाच्या परिवहन विभागाने 13 एप्रिल 2016 रोजीच्या पत्रान्वये याबाबतीतील नियमात एसटीला सवलत दिली आहे. याबाबतीत आता कुठलीही तांत्रिक अडचण नसून नॉन एसी स्लीपर कोच बसेसची बांधणीही सुरु आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात आणि लोकांच्या सेवेत या बसेस लवकरच दाखल होतील, असेही त्यांनी सांगितले. 

Tags : State Road Transport Corporation, non ac sleeper buses, pune, pune news