Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Pune › राज्य उत्पादन शुल्क : निवड होऊनही दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती नाहीच

राज्य उत्पादन शुल्क : निवड होऊनही दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती नाहीच

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरिक्षक या पदासाठी तब्बल तीनशे उमेदवारांची निवड झाली आहे. याला साधारण सात महिन्यांचा कालखंड लोटला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संबंधित उमेदवारांना केवळ शिफारसपत्र देण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांची नियुक्तीच झाली नाही.त्यामुळे निवड झालेल्या पदावर नियुक्ती नेमकी कधी देणार असा सवाल स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांनी विचारला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरिक्षक या पदासाठी मुख्य परिक्षा 2017 मध्ये घेण्यात आली. या पदाचा निकाल राज्य लोकसेवा आयोगाने 8 जानेवारी 2018 रोजी जाहीर केला. आणि निवड झालेल्या 300 उमेदवारांची शिफारस अप्पर मुख्य सचिवांना 19 जानेवारी 2018 रोजी केली. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू झाली. परंतु अद्याप देखील शिफारस पात्र उमेदवारांना दुय्यम निरिक्षक या पदावर नियुक्ती देण्यात आली नाही.

उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तीर्ण उमेदवारांची शारिरीक तपासणी व कागदपत्र पडताळणी दि.5 ते 7 एप्रील दरम्यान करण्यात आली.तसेच काही उमेदवारांची पोलिस व्हेरीफिकेशन तसेच वैद्यकीय तपासणी देखील झाली आहे. शासन निर्णयानुसार निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आतमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देणे आवश्यक आहे. मात्र संबंधित विभागाने निकाल लागून सात महिने झाले तरीही उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र दिले नाही. विशेष बाब म्हणजे 300 उमेदवारांची नेमणूक करण्यात आलेली असताना देखील विभागातील काही कर्मचार्‍यांना मे आणि जुलै महिन्यात दुय्यम निरिक्षक या पदावर तात्पूरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे यामागे नेमके काय कारण आहे आणि आमच्या नेमणूकीस जाणून-बूजून उशीर का करण्यात येत आहे. असा सवाल निवड झालेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

शासन नियमाप्रमाणे चारित्र्यपडताळणीची प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित विभागाने उमेदवारांना कोणतीही अंतिम मुदत दिली नसल्याने ज्या उमेदवारांना या पदावर रूजु व्हायचे नाही ते प्रक्रिया पूर्ण करत नसल्याने अन्य उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब होत आहे.तर सबंधित विभागात उमेदवारांनी संपर्क केला असता विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप देखील उमेदवारांनी केला आहे. यासंदर्भातील विचारणा करण्यासाठी लोकसेवा आयोगाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षेच्या निकालास सात महिने झाले. तरीदेखील अद्याप आम्हाला नियुक्ती मिळालेली नाही. सदर विभागाला संपर्क केला असता नियुक्तीबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. तसे पाहता 3 महिन्यात संबंधित विभागाला उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक आहे. असे असूनही आम्हाला का ताटकाळत ठेवण्यात आले आहे.? असा प्रश्न आम्हा सर्व निवड झालेल्या परीक्षार्थीना पडला आहे. - दुय्यम निरीक्षकपदी निवड झालेला एक विद्यार्थी.