Tue, Jul 23, 2019 16:40होमपेज › Pune › राज्य सहकार संघावर सर्वपक्षीय पदाधिकारी

राज्य सहकार संघावर सर्वपक्षीय पदाधिकारी

Published On: Apr 10 2018 2:12PM | Last Updated: Apr 10 2018 2:12PMपुणे : प्रतिनिधी

राज्य सहकारी संघाच्या पदाधिकारी निवडणुकीत सांगलीचे डॉ. प्रताप पाटील तर उपाध्यक्षपदी चंद्रपूरचे सिद्धार्थ पथाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर मानद सचिव पदासाठी निवडणूक होऊन लातूरच्या विद्या पाटील विजयी झाल्या. पाटील यांना 12 मते तर पराभूत उमेदवार हिरामण सातकर यांना 9 मते मिळाली. डॉ. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, पथाडे हे रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) तर विद्या पाटील या काँग्रेस पक्षाच्या आहेत. 

मात्र, भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार पॅनलचे सहकार्य घेऊन ते पदाधिकारीपदी विजयी झाले. पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार हे सर्वपक्षीय दिसत असले तरी सहकारी संघावर सहकार पॅनेलचे वर्चस्व दिसते आहे. संजीव कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनेलचे संचालक फुटल्याचा फटका त्यांना बसला आहे.
    
सहकारी संघाच्या कार्यालयात कडक पोलिस बंदोबस्तात मंगळवारी दुपारी बारा वाजता ओळखपत्र पाहून सर्व 21 संचालकांना सभागृहात बोलविण्यात आले आणि निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) आनंद कटके यांनी काम पाहिले. 

अध्यक्षपदासाठी संघाचे माजी उपाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील आणि सिद्धार्थ पथाडे यांची बिनविरोध निवड झाली. तर मानद सचिव पदासाठी विद्या पाटील यांच्याविरोधात कुसाळकर पॅनेलचे उमेदवार हिरामण सातकर (पुणे) यांनी अर्ज भरला असता पाटील या विजयी झाल्या. त्यानंतर आमदार दरेकर व आमदार लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्यासमवेत तीनही विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष केला. 19 मार्चच्या निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. मंगळवारी मात्र शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. 

भाजपाची नाही तर सर्वपक्षीय सत्ता : डॉ. प्रताप पाटील

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील म्हणाले की, भाजपप्रणित पॅनेलच्या ताब्यात सहकारी संघाची सत्ता आलेली नाही, तर सर्वपक्षीय नेत्यांच्या सूचनेनुसार समन्वय करून ही निवडप्रक्रिया राबविण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समन्वय घडवून आणण्यास सांगितले होते. त्यानुसार ही निवड झाली आहे. तीनही उमेदवार निवडीत आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी समन्वय केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला गतवैभव आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्त्वाखाली विजय मिळाला आहे. चळवळीतील काही अहंकारी लोकांमुळे सहकारी संघ ही संस्था अडचणीत आलेली आहे. यापुढे अडचणीतून संघ बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू.
           - प्रवीण दरेकर, भाजप आमदार, सहकार पॅनेल प्रमुख.

तीनही पदाधिकारी आमचेच : हिरामण सातकर        

निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना कुसाळकर गटातील सचिवपदासाठी पराभूत झालेले उमेदवार हिरामण सातकर म्हणाले की, सहकारी संघाच्या पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ. प्रताप पाटील आणि उपाध्यक्षपदी विजयी झालेले सिद्धार्थ पथाडे हे आमच्याच पॅनेलचे उमेदवार असल्याने कुसाळकर पॅनेलकडून उमेदवार देण्यात आला नाही. मानद सचिवपद मिळण्याचा आग्रह होता. मात्र, विद्या पाटील यांनी अर्ज भरल्याने त्यांच्याविरोधात मी अर्ज भरला. पाटील यांचा विजय झाला असला तरी त्यासुध्दा आमच्या गटाच्याच आहेत. निवडून आलेले तीनही पदाधिकारी हे कुसाळकर पॅनेलमधील आहेत. पदे मिळविण्यासाठी ते भाजपकडे गेले. सत्तेचा वापर भाजपने निवडणुकीत केला. त्यांनी अडचणीत असलेला सहकारी संघ बाहेर आणावा व शासनाचीही मदत घ्यावी. सरकारचे संघाला पाठबळ आवश्यक असून शिक्षण निधी पुन्हा सुरू करावा. बीओटी करारापासून सहकारी संघाची इमारत शासनाने वाचवावी.