Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Pune › जुन्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष

जुन्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:12AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य मंडळाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी आणि इयत्ता अकरावीची पुस्तके पुढील शैक्षणिक वर्षात (2018-2019) बदलणे प्रस्तावित आहे. त्यामुळे इयत्ता 2 री, 3 री आणि 11 वीच्या पाठ्यपुस्तकांसाठी हे वर्ष (जून 2018 ) शेवटचे असल्याने राज्यातील सर्व अधिकृत पुस्तकविक्रेत्यांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी आवश्यकतेनुसार पुस्तक खरेदी करावी, असे आवाहन राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने केले आहे. दरम्यान, इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीची पुस्तके नव्या शैक्षणिक वर्षात बदलणार असून जून 2018 पासून नवा अभ्यासक्रम शिकविण्यास प्रारंभ करण्यात येणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून मागील दोन वर्षांपासून राज्यातील विविध वर्गांचे अभ्यासक्रम बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत पाचवी ते सातवीची पुस्तके यापूर्वी बदलण्यात आली आहेत. यावर्षीपासून इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीची पुस्तके बदलण्यात येणार असून जून 2018 पासून नव्या शैक्षणिक सत्रापासून शाळांमध्ये या नव्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचबरोबर पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी आणि इयत्ता अकरावीची पाठ्यपुस्तके पुढील वर्षीपासून बदलण्यात येणार असल्याचे प्रस्तावित असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.

त्यामुळे इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी आणि इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकांसाठी हे वर्ष शेवटचे असणार आहे. 2018-19 हे या वर्गांच्या जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे शैक्षणिक वर्ष असून जून 2019 पासून नवा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. जुन्या पाठ्यपुस्तकांचे हे अखेरचे वर्ष असल्याने राज्यातील सर्व अधिकृत पुस्तकविक्रेत्यांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी आवश्यकतेनुसार पुस्तके खरेदी करावी, अशा सूचनाही राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने  दिल्या आहेत.