Sun, Mar 24, 2019 08:38होमपेज › Pune › राज्यात गायीच्या दुधाला २५ रूपये दर देण्यास सुरूवात(व्हिडिओ)

राज्यात गायीच्या दुधाला २५ रूपये दर देण्यास सुरूवात(व्हिडिओ)

Published On: Aug 02 2018 8:03PM | Last Updated: Aug 02 2018 8:48PMपुणे : प्रतिनिधी 

राज्यसरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटरला पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुण प्रतिच्या दुधाला २५ रुपये दर देण्यास सहकारी व खाजगी दुध व्यावसायिकांनी १ ऑगस्टपासून सुरूवात केली आहे. याबाबत अंमलबजाणी करताना एसएनएफबाबत काही अडचणी दुग्धव्यावसायिकांनी मांडल्या असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासमवेत बैठक होणार आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. अशी माहिती दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव यांनी दिली.  

याबाबत "पुढारी"शी बोलताना जाधव म्हणाले कि, ``राज्यात दररोज एक कोटी ३० लाख लीटर दुधाचे संकलन होते. त्यापैकी पाऊच पँकिगमधील दुध सुमारे ६० ते ६५ लाख लीटरच्या  आसपास आहे. उर्वरित दुधापासून पावडर, लोणी व अन्य उपपदार्थ बनविले जातात. शासनाच्या निर्णयाप्रमाणे सुरूवातीला शेतकऱ्यांना प्रति लिटरला २५ रूपये दर संस्थानी पहिला स्वतःच्या खिशातून द्यायचा आहे. एक ते दहा दिवसांच्या दुधाचा रक्कमेचा हिशोब प्रादेशिक दुग्धविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे. त्यामध्ये त्यांनी पाऊच पँकिगमधील दूध वगळून बनविलेल्या उपपदार्थांची माहिती शासनाला द्यावी लागेल. त्यानुसार ३.५ फँट आणि ८.५ एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला सरसकट २५ रुपये दर देण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर टाकली आहे. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना दर दिला की नाही, याची माहिती सादर करावयाची आहे.  त्यानंतर १५ किवा १६ तारखेला होणाऱ्या अनुदानाची रक्कम संबधित संस्थेला शासनाकडून तत्काळ देण्यात येणार आहे. याशिवाय दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी मोठ्या डेअरीवर शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. हे अधिकारी दुधाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवतील. त्यासंदर्भात माहिती वरिष्ठ कार्यालयाला देतील. तसेच परराज्यातील दुधाला अनुदान दिले जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

खडकी येथील शासकीय दुध योजनेच्या कार्यालयात शासन निर्णयाची अंमलबजावणी सुकर होण्यासाठी पुणे विभागातील सहकारी व खाजगी दूध व्यावसायिकांची बैठक गुरूवारी (दि. २) बोलविण्यात आली होती. त्यावेळी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ, कात्रज दूध डेअरीचे कार्यकारी संचालक डाँ. विवेक क्षीरसागर, सोनाई दुधाचे दशरथ माने, चितळे, गोकूळ, वारणा, स्वाभिमानी, पराग, प्रभात, वसंतदादा, गोंविद, शिवकृपा, फलटण, स्वराज, बारामती तालुका दूध संघासह सुमारे ५५ हून अधिक दूध ब्रँन्डचे प्रतिनिधी उपस्थित होते.