होमपेज › Pune › मतदार याद्या अद्ययावत करण्यास प्रारंभ

मतदार याद्या अद्ययावत करण्यास प्रारंभ

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:06AMपिंपरी : प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी, भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येत्या एक सप्टेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. 

दुबार, मयत आणि स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळण्यात येणार आहेत. मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि नव्याने माहिती घेण्यासाठी मतदान, केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाणार आहेत. सध्याच्या मतदार यादीमध्ये 1 जानेवारीला वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांच्या समावेश करण्यात आला आहे. मात्र, काही मतदारांची नोंदणी झाली नसल्यास त्यांची देखील नोंद होणार आहे.  

दरम्यान, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटी घेऊन माहिती गोळा करणार आहेत. या मोहिमेमध्ये 1 जानेवारी 2019 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणार्‍या युवा मतदारांनाही सामावून घेतले जाणार आहे. त्यांना 20 जानेवारीपर्यंत ओळखपत्रे दिली जाणार आहेत. नवीन नावे यादीत घेतानाच दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. संबंधित घरांना काल्पनिक क्रमांक द्यावा किंवा स्थानिक संस्थेमार्फत कायम क्रमांक देण्यात आला असल्यास त्याची माहिती गोळा करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. 

त्यामुळे प्रत्येक घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍याने भेट दिल्याचे स्पष्ट होईल. तसेच, मृत मतदारांची नावे वगळण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी अर्ज भरुन दिल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. 

राजकीय पक्ष, अशासकीय संस्था किंवा अन्य मार्गाने मृत मतदारांची माहिती मिळाल्यास पाहणी करुन नावे वगळली जाणार आहेत. मतदान केंद्रस्तरिय अधिकार्‍यांकडून घरोघरी भेटी देणे, 15 मे ते 20 जून,  प्रारुप मतदार यादी तयार करणे 31 ऑगस्ट, प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे 01 सप्टेंबर, दावे व हरकती स्वीकारणे 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर, 30 नोव्हेंबरला दावे हरकती निकालात काढणे असा मतदार यादी अद्ययावतीकरण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. संबंधित विधानसभा मतदारसंघनिहाय नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  गावडे यांनी केले आहे.

संगणक प्रणालीद्वारे दुबार नावांची पडताळणी

मतदार यादी अद्ययावत करताना मतदार यादीमध्ये दुबार किंवा समान नावे शोधणारी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. या नोंदीचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. नॉट मॅच, पॉझिटिव्ह, नॉट मॅच, निगेटिव्ह आणि डाऊटफूल अशा नोंदी मतदारांच्या नावापुढे करण्यात येतील. नॉट मॅच पॉझिटिव्ह अशी नोंद असल्यास संबंधित मतदारांना समान नोंद म्हणून समजण्यात येणार नाही. मात्र, नॉट मॅच, निगेटिव्ह आणि डाऊटफूल अशी नोंद असल्यास प्रत्यक्ष जाऊन तपासणी होणार आहे. त्यामध्ये नाव वगळण्यासाठी अर्जाचा नमुना सात भरुन घेतला जाणार आहे.