Wed, Aug 21, 2019 14:45होमपेज › Pune › अनवाणी पायांना ‘बेअर फूट’चा आधार 

अनवाणी पायांना ‘बेअर फूट’चा आधार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : ज्योती भालेराव-बनकर 

आजपर्यंत आपण गरजूंसाठी कपडे आणि अन्न वाटप करण्यात आल्याचे ऐकून आहोत. अनेक संस्था गरजूंसाठी नियमितपणे कपडे आणि अन्नपुरवठा करतात. मात्र, अनवाणी चालणार्‍यांसाठी चपला, बूट पुरवाव्यात आणि त्यांच्या पायाचे चटके कमी करावे, असा विचार करून पुण्यातील तीन जणांनी मिळून ‘बेअर फूट फाउंडेशन’ नावाची संस्था सुरू केली. ‘बेअर फूट फाउंडेशन’ असे या आगळ्यावेगळ्या संस्थेचे नाव आहे. चैत्र पाडव्याच्या मुहूर्तावर या संस्थेचे काम सुरू झाले आहे.

आजकाल अनेक कुटुंबामध्ये प्रत्येकाकडे एकापेक्षा जास्त चप्पल वा बुटांचे जोड असतात. यातील काही जोड कालांतराने वापरले जात नाही, ते तसेच पडून राहतात. मात्र अनेकदा असे पडून राहिलेले हे चप्पल-बूट योग्य गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही. अशा शहरातील विविध भागातील अनेक कुटुंबांना बेअर फूट फाउंडेशन गरजूंसाठी ‘पादत्राणे’ देण्याचे आवाहन करीत आहे. ही जमवलेली पादत्राणे गोळा करून, त्यांची दुरुस्ती करून शहर आणि ग्रामीण भागातील गरजूंना दिले जाणार आहेत. 

संयोगिता कुदळे, दीपाली पांढरे आणि विकास मुंदडा या तिघांनी मिळून या संकल्पनेला मूर्तस्वरूप दिले आहे. अनवाणी चालणार्‍या मुलांना पाहून त्यांच्यासाठी पादत्राणे जमवण्याची कल्पना या दोघींच्या मनात आली. आणि त्यांनी ती संकल्पना प्रत्यक्ष स्वरूपात सुरू केली. सध्या बेअर फूट फाउंडेशन पुण्यातील गुडविल इंडिया या प्रसिद्ध सामाजिक संस्थेबरोबर शहराच्या विविध भागांतून चप्पल-बूट गोळा करण्याचे काम करीत आहे. हा गोळा झालेला ऐवज गोडाऊनमध्ये साठवून त्या ठिकाणी त्यांच्या दुरुस्तीचे काम चांभाराकडून करून घेण्यात येत आहे. त्यांच्याकडून दुरुस्त केलेल्या चपला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शहर, ग्रामीण भागात पोहोचवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

सोशल मीडियावर मेसेजद्वारे केलेल्या या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळजवळ दहा हजारांवर पादत्राणांच्या जोड्या जमा झाल्या असल्याचे फाउंडेशनच्या सचिव संयोगिता कुदळे यांनी सांगितले. लोकांचा या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, सध्या आम्ही यासाठी लागणारा खर्च स्वत:च करीत आहोत; मात्र लवकरच आम्ही याचे एका ट्रस्टमध्ये रूपांतर करून त्याद्वारे हे काम वाढवणार आहोत. पुणे शहरातील हा पहिला असा प्रयत्न असल्याचेही त्या आवर्जून सांगतात. बाहेरील शहरातून जसे की अकोला, औरंगाबाद, ठाणे आदी ठिकाणांहूनही त्यांना प्रतिसाद मिळत असून, त्याठिकाणी अशा प्रकारची सोय करण्यासही त्यांना लोक सुचवत आहेत. या उन्हाळ्यापासून बेअर फूट फाउंडेशनच्या कार्यामुळे अनेक अनवाणी पायांना आधार मिळणार आहे हे मात्र नक्की. 


  •