Sat, Jan 19, 2019 15:44होमपेज › Pune › ‘स्टेन्ट’चा गोलमाल चव्हाट्यावर

‘स्टेन्ट’चा गोलमाल चव्हाट्यावर

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 11 2018 1:19AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला म्हणून एका रुग्णाने ‘स्टेन्ट’ बसवून घेतला. परंतु, त्याच्या छातीत पुन्हा दुखू लागल्याने केलेल्या तपासणीत रुग्णाच्या हृदयात ‘स्टेन्ट’ बसविलाच नसल्याचे आढळून आले. हा प्रकार शिवाजीनगर परिसरातील ‘ओएस्टर अँड पर्ल’ या हॉस्पिटलमध्ये घडल्याचे समोर आले आहे. ‘स्टेन्ट’चा गोलमाल चव्हाट्यावर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी ‘ओएस्टर अँड पर्ल’मध्ये एका रुग्णाच्या हृदयात ‘स्टेन्ट’ बसविल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचे बिलही लावले. पण, त्याच्या छातीत पुन्हा दुखू लागल्याने तो स्थानिक डॉक्टरकडे गेला असता त्याला ‘स्टेन्ट’ बसवलाच नसल्याचे समजले. मात्र, आधी कल्पना दिल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

बिल घेतले, पण ‘स्टेन्ट’ बसविला  नसल्याचा डॉक्टरांचा दावा

‘स्टेन्ट’ बसविण्यामध्ये गोलमाल झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि रुग्णाकडून दोन ते अडीच लाख रुपये बिल घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधला. तेथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील अग्रवाल त्याबाबत म्हणाले, दीड वर्षापूर्वी असा एक रुग्ण आला होता. तपासणी केली असता त्याच्या हृदयाची एक रक्‍तवाहिनी 100 टक्के ब्लॉक असल्याचे आढळले. यावेळी रुग्णाची तब्येत ‘क्रिटीकल’ असल्याने त्याच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रुग्णाला ‘स्टेन्ट’ बसविण्यापूर्वी रक्‍तवाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी बलून (फुगा) टाकण्यात आला. यानंतर नवीन ‘स्टेन्ट’ रुग्णाला बसविण्याचा प्रयत्न केला पण तो रक्तवाहिनीतील अडथळ्यातून पुढे सरकत नसल्याने तो परत काढण्यात आला. दरम्यान, रक्तवाहिनीतील अडथळा 100 टक्क्यांवरून 70 टक्के कमी झाल्याने ‘स्टेन्ट’ बसवला नाही. पण, तो ‘स्टेन्ट’ नवीन पॅकेटमधून काढल्याने त्याचे दोन ते अडीच लाख रुपये बिल आकारण्यात आले.

याची कल्पना संबंधित रुग्णाला देण्यात आली होती.’ माहितीनुसार संबंधित रुग्ण कोल्हापूर येथील आहे. परंतु त्याचा निश्‍चित ठावठिकाणा मिळाला नाही. त्यामुळे डॉ. अग्रवाल यांच्याकडेच चौकशी केली असता त्यांनी त्या रुग्णाचे नाव, गाव आपणास आठवत नाही, असे सांगितले. तथापि ‘त्या रुग्णाचे रक्‍त पातळ राहावे म्हणून काही औषधे सुरू करण्यात आली होती. रुग्णानेही औषधे सात ते आठ महिन्यापर्यंत घेतली. त्यानंतर ही औषधे न सांगता बंद केल्यामुळे त्याला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला, असे डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले.