Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Pune › ‘लॉटरी’ ठरविणार स्थायी समितीच्या आठ सदस्यांचे भवितव्य

‘लॉटरी’ ठरविणार स्थायी समितीच्या आठ सदस्यांचे भवितव्य

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:55AM

बुकमार्क करा
पुणेः प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांच्या निवृत्तीसाठी या महिना अखेरपर्यंत लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे आठ नव्या सदस्यांना स्थायी समितीमध्ये संधी मिळणार असून पुढील महिन्याच्या मुख्यसभेत या नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे या लॉटरीमध्ये स्थायीतून कोण बाहेर पडणार आणि कोण राहणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हापालिकेच्या तिजोरीची चावी म्हणून स्थायी  समितीला ओळखले जाते. महापालिकेचे सर्व आर्थिक प्रस्तावांना या समितीच्या माध्यमातून मंजुरी दिली जाते. पालिकेच्या विविध समित्यांमध्ये या समितीला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे समितीवर सदस्य म्हणून वर्णी लावण्यासाठी स्पर्धा असते. या समितीच्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या 16 इतकी आहे. त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असतो. मात्र महापालिका निवडणूकीनंतर अस्तित्वात येणार्‍या स्थायी समितीमधील आठ सदस्यांना केवळ एक वर्षाचा कालावधी मिळतो. त्यानुसार स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या 28 फेब्रुवारी संपुष्टात येणार आहे. मात्र, नक्कि कोणत्या सदस्यांना स्थायी समितीमधून बाहेर पडावे लागणार याचा निर्णय येत्या जानेवारी अखेरपर्यंत होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून लॉट्री काढण्यात येणार आहे. त्यात सर्व 16 सदस्यांच्या नावाच्या चिठ्या टाकून त्यातून आठ सदस्यांच्या चिठ्या काढण्यात येणार आहे. ज्या सदस्यांची त्यामध्ये नावे येतील, त्या सदस्यांना स्थायी समितीमधून बाहेर पडावे लागणार आहे. त्याच्या जागी नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारी महिन्याच्या मुख्यसभेत निवड केली जाणार असून त्याचा कार्यकाळ 1 मार्चपासून सुरू होणार आहे. दरम्यान ज्या पक्षाचे अधिक सदस्य निवृत्त होतील, त्यापक्षाच्या सदस्यांना स्थायीत संधी मिळणार असणार आहे, या लॉटरीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.