Fri, Apr 26, 2019 04:10होमपेज › Pune › सहा सदस्यांद्वारे आ. लांडगे देणार ‘स्थायी’त आ. जगताप गटाला शह

सहा सदस्यांद्वारे आ. लांडगे देणार ‘स्थायी’त आ. जगताप गटाला शह

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 1:29AMपिंपरी : संजय शिंदे 

स्थायी समिती अध्यक्षपदामध्ये आ. महेश लांडगे गटाला शह मिळाल्यामुळे पालिकेतील इतर दोन गटांत उकळ्या फुटल्याची चर्चा होती; मात्र चिठ्ठीत बचावलेल्यांना पक्षाच्या नियमाचा फटका बसला. त्या जागी पाच नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. त्यापैकी चार जागा आ. लांडगे गटाला मिळाल्यामुळे भाजपच्या वाट्याला असलेल्या 11 जागांपैकी लांडगे गटाकडे 6 जागा आल्या आहेत. या संख्यबळाच्या जोरावर आ. लांडगे गट ‘स्थायी’त वरचढ ठरू पाहात असलेल्या आ. जगताप गटाला शह देणार असल्याच्या चर्चेला ऊत आला असून, या सदस्यांना आ. लांडगे जनसंपर्क कार्यालयातून बळ मिळणार असल्याची चर्चा भोसरी व शहरात आहे. 

भाजपच्या नवीन नियमानुसार स्थायी समिती सदस्य दरवर्षी नवीन करण्याचे ठरल्यानुसार, पालिकेत प्रथम सत्ता स्थापन केलेल्या भाजपने पहिल्या टप्प्यात 8 जणांपैकी भाजपने 6 सदस्यांची निवड केली. त्यातून अध्यक्षपद निवडीतून शह-काटशह देत आ. जगताप समर्थक ममता विनायक गायकवाड यांची निवड करण्यात आली. 

भारतीय जनता पार्टीमधील निष्ठावंत गटाकडून इच्छुक असणारे विलास मडिगेरी व शीतल शिंदे हे आ. जगताप गटाकडे झुकल्याची चर्चा आहे. आ. लांडगे गटाकडून इच्छुक असणारे राहुल जाधव यांनी स्थायी अध्यक्षपद मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि ती आजमितीसही आहे. 

चिठ्ठीतून भारतीय जनता पार्टीच्या बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागेवर सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, साधना मळेकर, अर्चना बारणे या पाच सदस्यांची निवड करण्यात आली आहे. 16 पैकी भाजपचे 11 सदस्य आहेत. त्यापैकी आ. जगताप गट 3, निष्ठावंत गट 2 व आ. लांडगे गट 6 असे सदस्यांचे बलाबल आहे. 

जगताप गटाचे 3 आणि निष्ठावान गटाचे 2 सदस्य एकत्र काम करताना दिसत आहेत. महिला अध्यक्ष असल्यामुळे विलास मडिगेरी प्रवक्ता म्हणून काम करत आहेत; मात्र आ. लांडगे गटाला अध्यक्षपदात मात मिळाली असली, तरी स्थायी समितीत 6 सदस्य आ. लांडगे गटाचे झाल्यामुळे आ. जगताप समर्थकांकडून पुढे आलेले विषय आता एकमताने मंजूर होणार का याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आ. लांडगे गटाकडून राहुल जाधव, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, विकास डोळस, यशोदा बोईनवाड व अपक्ष गटाकडून झालेल्या साधना मळेकर या सहा सदस्यांना आ. लांडगे जनसंपर्क कार्यालयातून मार्गदर्शन होणार असल्यामुळे एकतर्फी निर्णय घेऊ, असा जो होरा आ. जगताप गटाकडून व्यक्त होत होता त्याला आता छेद मिळणार, अशी चर्चा भाजपमध्येच सुरू झाली आहे.