Fri, Nov 16, 2018 17:10



होमपेज › Pune › पूणे : समिती अध्यक्षांसह भाजपाचे ६ तर राष्ट्रवादीचे २ सदस्य निवृत्त

पूणे : समिती अध्यक्षांसह भाजपाचे ६ तर राष्ट्रवादीचे २ सदस्य निवृत्त

Published On: Feb 07 2018 6:22PM | Last Updated: Feb 07 2018 6:22PM



पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्यांची चिठ्ठी पत्रकारांच्या हस्ते काढण्यात आली. त्यात विरोधकांच्या आरोपाच्या गर्तेत अडकलेल्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांची चिठ्ठी सर्वात प्रथम निघाल्याने त्या समितीतून बाहेर पडल्या आहे. त्यासह भाजपाचे  कुंदन गायकवाड, हर्षल ढोरे, उषा मुंढे, कोमल मेवानी, आशा शेंडगे हे भाजपाचे सहा सदस्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर हे समितीतून बाहेर पडले. 

महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. महापालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात नगरसचिव विभागाने चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया पार पडली. नगरसचिव उल्हास जगताप यांनी सर्व प्रक्रिया सांगितली.  प्रथम सर्व १६ सदस्यांची नावे पांढर्‍या रंगाच्या चेंडूत टाकण्यात आले. हे सर्व चेंडू पारदर्शक भरणीत टाकून फिरवण्यात आले. त्यातून पत्रकारांच्या हस्ते एक-एक चेंडू बाहेर काढण्यात आली. 

त्यात पहिला चेंडू समिती अध्यक्षा सावळे यांचीच निघाली. त्यापाठोपाठ कुंदन गायकवाड, उषा मुंढे, कोमल मेवानी या भाजपाच्या चार सदस्यांच्या चिठ्‌ठ्या निघाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे व वैशाली काळभोर यांची चिठ्ठी बाहेर पडली. पाठोपाठ भाजपाचे हर्षल ढोरे व आशा शेंडगे यांच्या नावाचे चेंडू बाहेर पडला.  हे सर्व आठ सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाल पार पडला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे राजू मिसाळ व मोरेंश्‍वर शेडगे हे गैरहजर होते. त्यांच्या नावाची चिठ्ठी न निघाल्याने ते ‘लकी’ असल्याची चर्चा महापालिकेत होती. 

महापालिकेच्या आर्थिक नियंत्रण स्थायी समितीच्या हातात असते. शहराच्या विकासाचे नियोजन स्थायी समितीमध्ये केला जाते. अनेक धोरणात्मक निर्णय स्थायीत घेतले जातात. त्यामुळे स्थायी समितीत सदस्य म्हणून येण्यासाठी नगरसेवक अधिक उत्सुक असतात. फेबु्रवारीच्या २० तारखेच्या सर्वसाधारण सभेत नव्या सदस्यांची नावे जाहीर केली जातील. त्यासाठी भाजपासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी केली आहे. 
भाजपाचे माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, राष्ट्रवादीचे मिसाळ, भोडवे, शिवसेनेचे अमित गावडे, अपक्ष कैलास बारणे हे यांच्या नावाची चिठ्ठी न निघाल्याने ते नशीबवान ठरले आहेत.

भाजपाने घेतले ११ सदस्यांचे राजीनामे

दरवर्षी ११ नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यांची संधी मिळावी, म्हणून भाजपाने समितीमधील भाजपाचे सर्व १० व १ अपक्ष असे ११ जणांचे राजीनामे घेतले आहेत. त्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे हे दोघे महापालिकेत  ठाण मांडून बसून होते. स्थायी समिती सभा सुरू होण्यापूर्वी महापौर दालनातील ऍन्टी चेंबरमध्ये स्थायीच्या सर्व ११ सदस्यांना बोलावून घेऊन त्यांचे राजीनामे घेण्यात आले. त्यामुळे सर्व ११ सदस्यांचे चेहरे पडले होते. या सर्व की काही मोजक्या सदस्यांना पुन्हा स्थायीमध्ये संधी दिली जाणार का, या संदर्भात पक्षनेत्यांनी बोलण्यास नकार दिला.