Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Pune › राज्यातील ५३  महाविद्यालयांतील कर्मचार्‍यांची उपासमार

राज्यातील ५३  महाविद्यालयांतील कर्मचार्‍यांची उपासमार

Published On: Feb 28 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 1:38AMपुणे : लक्ष्मण खोत

 गेल्या अठरा वर्षांपासून विद्यादानाचे पवित्र काम करूनही त्याच्या बदल्यात साधी कवडीही मिळत नाही. परिणामी दिवसभरातील आठ तास अध्यापनाचे कर्तव्य बजावून, सकाळी दहा वाजेपर्यंत तर सायंकाळच्या इतर वेळेत दुकानावर मुनीम म्हणून काम करत संसाराचा गाडा चालवत आहे... ही व्यथा आहे प्राध्यापक असाराम आवचार यांची. अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी मान्याताप्राप्त 53 महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचार्‍यांची झाली आहे.  

प्राध्यापक आवचार जालना जिल्ह्यातील आष्टी येथील लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून गेल्या 18 वर्षापासून काम करतात. परंतु 24 नोव्हेंबर 2001 ला घेतलेल्या शासनाच्या कायम विनाअनुदानितचा निर्णय येणापूर्वी मान्यता मिळालेल्या राज्यातील 53 महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचार्‍यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. कायम अनुदानितचा निर्णय येणापूर्वी टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जात होते. परंतु ही महाविद्यालये अद्यापही अनुदानापासून वंचित असून, प्राध्यापक, कर्मचार्‍यांचे जगणे मुश्कील झाले आहे. याबाबत बोलताना आवचार म्हणाले की, मी गेल्या 18 वर्षापासून प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहे. मात्र, या काळात शासनाचा एक रुपयाही वेतन मिळाले नाही. अशीच काहीशी अवस्था परळी वैजनाथ येथील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात सेवक म्हणून काम करणार्‍या सुग्रीव दहिफळे यांचीही आहे.

दहिफळे म्हणाले की, सेवक म्हणून 2001 साली नोकरीस लागलो. आतापर्यंत सेवेस 18 वर्षे पूर्ण झाली असून, अद्याप शासनाचा एक रुपयाही वेतन मिळालेले नाही. आज माझ्या मुली लग्नाला आल्या असून, त्यांची लग्ने कशी करायची, असा प्रश्‍न पडला असल्याचे दहिफळे यांनी सांगितले. दरम्यान, शासनाकडे या 53 महाविद्यालयांना अनुदान मिळावे यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे 17 वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे काम करणार्‍या प्राध्यापकांच्या कुटुंबांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. त्याविरोधात पाच प्राध्यापक कर्मचार्‍यांनी उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर शुक्रवारपासून (दि. 23 फेब्रुवारी) बेमुदत उपोषण सुरू केले. यामध्ये प्रा. बाबाजी बनसोडे, प्रा. शिवराज चव्हाण, कृष्णा खोडवे, जयेश पाटील आणि प्रा. नागेश चंदनशिवे यांचा समावेश आहे. उपोषणाचा आज (28 फेब्रु.) सहावा दिवस आहे. यातील शिवराज चव्हाण वगळता इतर चौघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या 2001 पूर्वी मान्यताप्राप्त कायम विना अनुदानित महाविद्यालयांतील कर्मचार्‍यांचे प्रश्‍न आता तरी सुटणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  

शिक्षणमंत्री तावडेंची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर.. 

सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे 2014 मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना, 20 नोव्हेंबर 2001 पूर्वी शासन मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्‍नावर तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना याच प्रश्‍नावर जाब विचारला होता. या महाविद्यालयांना तत्काळ अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली होती. परंतु सत्तेत येऊन 3 वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही केवळ आश्‍वासनांपलीकडे या कर्मचार्‍यांना ते काही देत नाहीत. त्यामुळे तावडे यांची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आली आहे.