Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Pune › क्रीडा विभागाकडून पुण्याला ‘वाटाण्याच्या अक्षता’

क्रीडा विभागाकडून पुण्याला ‘वाटाण्याच्या अक्षता’

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 24 2018 11:29PMपुणे : सुनील जगताप

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात असताना क्रीडा संस्कृतीही मोठ्या प्रमाणावर रुजत चालली आहे. असे असताना शासनाकडून मात्र, क्रीडा क्षेत्राला दुय्यम स्थान मिळत असल्याचे समोर आले आहे. शासनाने जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली असून त्यासाठी देण्यात आलेल्या निधीमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेशच नाही. परंतू पुण्याला दहा लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी (डीएसओ) यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य रहावे, नागरिकांमध्ये व्यायामाची आवड जोपासावी, राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंचा गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी केंद्रबिंदू मानून क्रीडा धोरण तयार करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रही स्थापन करण्यात आले. या केंद्रांसाठी तब्बल 506 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली असून त्यापैकी 1 कोटी 63 लाख 98 हजार रुपयांचा निधीही वितरीत करण्यात आला आहे. या वितरीत करण्यात आलेल्या निधीमध्ये विभागवारामध्ये मुंबई, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद, लातुर, नागपूर आणि अमरावती यांचा समावेश करण्यात आला असून पुणे विभागाला मात्र वगळण्यात आलेले आहे. 

या निधी वितरणामध्ये सर्वात जास्त नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्याला 12 लाख 72 हजार रुपयांचा, उस्मानाबाद जिल्ह्याला 11 लाख रुपयांचा, धुळ्याला 10 लाख 92 हजार रुपयांचा, चंद्रपुरला 10 लाख 54 हजार रुपयांचा, गडचिरोलीला 10 लाख रुपयांचा, अमरावतीला 9 लाख 79 हजार रुपयांचा, लातुर जिल्ह्याला 9 लाख 98 हजार रुपयांचा तर नांदेडला 9 लाख 29 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. 

या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुण्याचा कोठेही समावेश करण्यात आलेला नाही. पंरतू जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा निधी मिळाला असल्याचे सांगण्यात असून 14 लाखाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्यापैकी 10 लाख रुपये मंजुर झाले आहेत.

याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान म्हणाले की, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रासाठी शासनाकडे 14 लाख रुपये निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता. त्यापैकी 10 लाख रुपयांचा निधी पुण्याला मंजुर झालेला आहे. दरवर्षीच हा प्रस्ताव पाठवावा लागत असतो. त्याप्रमाणे हा निधी मंजुर असून पिंपरी चिंचवड येथील क्रीडा प्रबोधिनी, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती क्रीडा संकुल तसेच इतर क्रीडा संकुलांना वितरीत करण्यात येणार आहे.