Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Pune › क्रीडा संघटक प्रल्हाद सावंत यांचे निधन

क्रीडा संघटक प्रल्हाद सावंत यांचे निधन

Published On: Aug 10 2018 1:24AM | Last Updated: Aug 10 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, अ‍ॅथलेटिक्सचे भीष्माचार्य, प्रभावी क्रीडा संघटक, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे संस्थापक सदस्य आणि महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

प्रल्हाद सावंत यांना पत्रकारनगर येथील रहात्या घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना सेनापती बापट रस्त्यावरील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनामुळे अ‍ॅथलेटिक्ससह राज्याच्या क्रीडाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत अ‍ॅथलेटिक्स खेळासाठी आयुष्य वेचणारे प्रल्हाद सावंत यांनी, कविता राऊतपासून ते ललिता बाबरपर्यंतच्या ऑलिम्पिक धावपटू घडविण्यात बहुमोल योगदान दिले. याचबरोबर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक धावपटू त्यांनी घडविले.

देशातील सर्वात जुनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तब्बल 32 वर्षे प्रल्हाद सावंत यांच्याच मार्गदर्शनाखाली अविरतपणे सुरू होती. याचबरोबर नऊ ऑलिम्पिक स्पर्धांचे वार्तांकन करणारे ते एकमेव मराठी क्रीडा पत्रकार होते. अ‍ॅथलेटिक्समध्ये जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय संघटनेत विविध पदावर त्यांनी प्रभावीपणे कार्य केले. पुणे हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र मॅरेथॉन क्रीडा प्रतिष्ठान संघाचे संस्थापक अध्यक्ष, पुणे मॅरेथॉन मासिकाचे संपादक अशी विविध पदे त्यांनी भूषविली. क्रीडा कारकिर्दीत सावंत यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडूंना घडविले आहे. राज्य शासनाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळणारे ते एकमेव क्रीडा पत्रकार होते. 1990 मध्ये उत्कृष्ट आयोजक म्हणून राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.