होमपेज › Pune › प्रत्येक प्रभागातील क्रीडा नर्सरी ‘कागदावरच’

प्रत्येक प्रभागातील क्रीडा नर्सरी ‘कागदावरच’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : सुनील जगताप

स्थानिक पातळीवरच लहान वयात खेळाविषयीचे योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण मिळाल्यास पुण्यात आणि महाराष्ट्रात पदक विजेत्यांची संख्या वाढेल, या उद्देशाने महापालिकेच्या 2012 च्या क्रीडा धोरणामध्ये क्रीडा नर्सरीची तरतूदही करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या वतीने या योजनेला मंजुरी देऊनही त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही होऊ शकलेली नाही. गेल्या सहा वर्षातील ही योजना खेळाडूंच्या भवितव्याचा विचार न होता फक्‍त ‘कागदावरच’ रखडलेली आहे. 

महापालिकेच्या क्रीडा धोरणामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये क्रीडा नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑक्टोबर 2013 मध्ये या धोरणाच्या दुरुस्ती मसुदा सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. त्याला मंजुरीही देण्यात आली होती, परंतु त्यावेळी त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद मात्र अत्यल्प असल्याने तसेच शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत हा विषय असल्याने महापालिकेच्या क्रीडा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. 

या क्रीडा धोरणामध्ये अंगणवाडीच्या धर्तीवर ही क्रीडा नर्सरीची योजना असून, या नर्सरीमध्ये 3 ते 12 वयोगटाच्या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. लहान मुलांचे 3 ते 7 व 8 ते 12 अशा दोन गटात विभागणी करून प्रशिक्षण दिल्यास ते अधिक उपयुक्‍त ठरणार आहे. या नर्सरीमध्ये मानधनावर प्रशिक्षक, क्रीडा साहित्य, व्यवस्थापन, क्रीडांगण देखभाल यासाठी सहाय्यक अनुदान देण्यात येणार आहे. तसेच स्पोर्टस नर्सरीच्या अभ्यासक्रमाचे जनरल फिटनेस, मनोरंजनात्मक खेळ, जिम्नॅस्टिक, अ‍ॅथलेटिक्स आदी खेळांचा त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक खेळाच्या सुध्दा स्वतंत्र स्पोर्टस नर्सरी सुरू करण्यात याव्यात. जेणेकरून लहान वयातच मुलांना खेळाची आवड निर्माण होणार आहे. या माध्यमातून तंत्रशुध्द प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे या धोरणामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु ही क्रीडा नर्सरीची योजना कागदावरच राहिली असून पदक मिळविण्याची स्वप्ने धुसर होऊ लागली आहेत.

याबाबत बोलताना महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्‍त किशोरी शिंदे म्हणाल्या की, क्रीडा नर्सरीची योजना जुनी आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. सध्याच्या परिस्थितीत धनकवडी येथे एका क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून अशा प्रकारची क्रीडा नर्सरी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. इतर प्रभागातही नर्सरी उभी करण्याचा प्रयत्न आगामी कालावधीमध्ये केले जातील. 

 

Tags : pune, pune news, Sports, Sports Nursery, 


  •