Sun, Jul 21, 2019 01:41होमपेज › Pune › शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 10 2018 12:59AMपिंपरी : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात बंद पाळण्यात आला. या बंदला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मार्गावर पीएमपीएमएलच्या तुरळक बस धावत होत्या. रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. 

पिंपरी गाव, कॅम्प, संत तुकारामनगर, भोसरी, इंद्रायणीनगर, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, चिखली, जाधववाडी, निगडी प्राधिकरण, मोहननगर, आकुर्डी, पिंपळे सौदागर, सांगवी, रहाटणी आदी शहराच्या विविध भागांतील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. पिंपरी-चिंचवड शहरात सर्व नदीघाटांवर अग्निशमन दल आणि बचाव पथके, तसेच शासकीय कार्यालयांमध्ये बचाव पथके तैनात करण्यात आली होती. चाकण आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आंदोलनात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व आंदोलकांनीदेखील यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. प्रत्येक चौकामध्ये पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील बहुतांश भागातील पीएमपीएमएल सेवा बंद ठेवली होती.

एरवी पुणे-मुंबई महामार्ग, तसेच  हिंजवडीच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे कसरत असते, मात्र गुरुवारी या रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. या परिसरातही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पिंपरी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणाहून रॅलीने कार्यकर्ते पिंपरी चौकात येत गेले तेथे सभा घेण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक मारुती भापकर, विनायक रणसुभे, प्रकाश जाधव, अभिमन्यू पवार, रूपाली पाटील आदींनी मराठा आरक्षणाची आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार फसणवीस सरकार असल्याची टीका या वेळी करण्यात आली.

राष्ट्रवादीचा पाठिंबा 

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरेे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ज्या तरुणांनी बलिदान दिले, त्या तरुणांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. या वेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, संतोष वाघेरे, शैलेश वाघेरे, स्वप्निल वाघेरे, रामदास मोरे, दत्तात्रय जगताप यांच्यासह आंदोलनात राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी सामील झाले होते.

काँग्रेसचा पाठिंबा

काँग्रेसनेही या आंदोलनास पाठिंबा दिला. शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, भाजपला सत्ता दिल्यास शंभर दिवसांत मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. जनतेने आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना सत्ता दिली. चार वर्षे उलटून गेली, तरी सरकार वेळकाढूपणा करीत आहे. 

भाजपचाही पाठिंबा

महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, विलास मडीगिरी, शीतल शिंदे यांनीही मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.

मुस्लिम आरक्षण कृतीचा पाठिंबा 

मुस्लिम आरक्षण कृती समितीने मराठा समाजास आरक्षण देण्यास पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यनिर्मिती केली. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पाठीशी मुस्लिम समाज खंबीरपणे उभा होता. तशीच इतिहासाची परंपरा कायम ठेवत असताना आज पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पिंपरी-चिंचवड मुस्लिम आरक्षण कृती समिती पाठिंबा देत आहे. या पत्रावर अजहर खान, अजिज शेख, मेहबुब शेख, युसुफ कुरेशी, इम्रान बिजापुरे, जाफर मुल्ला, हाजी गुलाम रसुल, फैज दलाल, मुन्ना शेख, रमजानभाई अत्तार, ईसाक राज आयुब शेख, लतीफ सय्यद आदींच्या सह्या आहेत.