Sun, Aug 25, 2019 12:16होमपेज › Pune › आध्यात्‍मिक गुरू दादा वासवानी यांचे निधन

आध्यात्‍मिक गुरू दादा वासवानी यांचे निधन

Published On: Jul 12 2018 12:45PM | Last Updated: Jul 13 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

आध्यात्मिक गुरू दादा जशन पहलाजराय वासवानी (जे. पी. वासवानी, वय 99) यांचे गुरुवारी (दि. 12) सकाळी नऊ वाजता साधू वासवानी मिशनमध्ये निधन झाले. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांनी स्थापन केलेल्या साधू वासवानी मिशनचे ते प्रमुख होते. त्यांच्यावर मागील 15 दिवसांपासून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. येत्या दि. 2 ऑगस्टला ते वयाची शंभरी पूर्ण करणार होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह अनुयायींनी हळहळ व्यक्त केली. शुक्रवार, दि. 13 सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दादा वासवानी यांचा जन्म सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात 2 ऑगस्ट 1918 मध्ये झाला होता. लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान असलेल्या दादांनी वयाच्या 17व्या वर्षी एमएस्सीची पदवी मिळविली होती. इंग्रजी आणि सिंधी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. साधू वासवानी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगीकारले. अगदी सोप्या भाषेत अनुयायांना विचारांचे धडे देण्यात त्यांचा हातखंडा होता. साधी राहणी, अंगात पांढरा शर्ट, पायजमा, त्यावर ओढलेली मोठी पांढरी शाल, साधी चप्पल, हसता चेहरा, चमकदार डोळे ही दादांची वैशिष्ट्ये होती. साधू वासवानी यांच्या निधनानंतर साधू वासवानी मिशनची सूत्रे दादा जे. पी. वासवानी यांच्याकडे होती. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात साधू वासवानी मिशनच्या वतीने भरीव कामगिरी केली आहे. देशभरात मिशनच्या 18 शाळा असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडनमध्ये लिटल लॅम्प नर्सरीची उभारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत; तसेच रुग्णालये आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून मिशनचे कार्य समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय ठरत आहे. 

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

दादा जे. पी. वासवानी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरद्वारे शोक व्यक्त केला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राज्यवर्धन राठोड, वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू, लेखक अमिष त्रिपाठी यांनीही दुःख व्यक्त केले आहे.

दादा वासवानींचे दर्शन घेणारे मान्यवर 

दादा जे. पी . वासवानी यांच्या निधनानंतर अनुयांयासह अनेक भक्तांनी साधू वासवानी मिशनमध्ये त्यांच्या अंतिम दर्शनसाठी रांगा लावल्या होत्या. त्यामध्ये पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे, माजी आमदार उल्हास पवार यांचा समावेश होता.

अंतिम रथयात्रेचा मार्ग

साधू वासवानी चौक-कौन्सिल हॉल- पूना क्लब-हॉटेल सागर प्लाझा-डोराबजी- हॉटेल सुप्रिया-रहिम पेट्रोलपंप-सायकल सोसायटी-क्वॉटर गेट-इरवीन रोड-पदुमजी गेट पोलिस चौकी-निशात टॉकीज-अगरवाल कॉलनी-बाबाजान चौक-महात्मा गांधी रोड-अरोरा टॉवर्स-नेहरू मेमोरियल हॉल-साधू वासवानी कुंज-शांती कुंज-प्रेम कुटीर या मार्गावरून त्यांची रथयात्रा काढण्यात येणार आहे.