पिंपरी :
भोसरीतील गायरान जमीन पालिकेकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. एकूण 16 गायरानांपैकी 4 जमिनींचे हस्तांतरण झाले असून, अन्य जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया मार्गी लागेल, असा विश्वास आ. महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत आ. महेश लांडगे यांनी बैठक घेतली. यावेळी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, उपस्थित होते.
भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये शासकीय गायराने एकूण 16 आहेत. ही सर्व जमीन जिल्हाधिकारी यांच्या मालकीची आहे. त्या जागेची देखभाल करण्यासाठी पालिकेकडे जागा हस्तांतरण करण्याची गरज आहे. ज्यावेळी संबंधित गावे पालिकेकडे समाविष्ट केली. तेव्हापासून हा विषय प्रलंबित होता. याबाबत आ. लांडगे यांनी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा केला. दरम्यान, काही जागा या विभागीय आयुक्तांनी शासनाकडे हस्तांतर प्रक्रियेसाठी पाठवल्या असून, ती प्रक्रिया दीर्घ मुदतीची आहे. त्यामुळे शासनाने हे सर्व हस्तांतरणाचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले असून, येत्या महिन्याभरात हे सर्व प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणावेत, अशा सूचनाही आ. लांडगे यांनी दिल्या आहेत.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेबाबत मी स्वत: लक्ष घालून राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.