पुणे : देवेंद्र जैन
शहरात असे अनेक ‘विशिष्ट’ पोलिस अधिकारी आहेत, जे अनेक वर्षांपासुन पुणे शहरातच ठाण मांडून बसले आहेत. या ‘विशिष्ट’ अधिकार्यांचे विशेष असे की, राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ज्यावेळी पोलिस महासंचालक कार्यालयातून सर्वसाधारण बदल्यांचे आदेश निघतात, त्यावेळी ते स्वतःच्या बदलीची ‘सांगड’ आधीच घालून ठेवतात आणि त्यांचे पुण्यातील बस्तान कायम राहते. यामध्ये अनेक उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, फौजदार पुढे असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे हे अधिकारी शहरात ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे अनेक ‘विशिष्ट’ व्यवहार बिनबोभाट सुरू राहतात.
पुणे शहरात आयुक्तालयाबरोबरच गुन्हे अन्वेषण विभाग, कारागृह विभाग, बिनतारी संदेश यंत्रणा विभाग, राज्य राखीव पोलिस दल, एम.आय. ए., एस. आय. डी., जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, अशी अनेक महत्त्वपूर्ण कार्यालये आहेत, यापैकी कुठल्याही ठिकाणी बस्तान बसले तरी चालेल; पण पुणे सोडायचे नाही, असाच या ‘विशिष्ट’ अधिकार्यांचा प्रयत्न दिसतो.
राज्याचे मुख्यमंत्री ज्याच्याकडे गृह खात्याचाही कारभार आहे, त्यांनी सत्तेवर येताच, वर्षानुवर्षे एकाच शहरात वास्तव्य करून असणार्या पोलिस अधिकार्यांना ‘विदर्भ दाखवणार’ ‘घोषणा’ केली होती. त्यावेळी सामान्य माणसाला, या ‘विशिष्ट’ अधिकार्यांची खोड मोडणार, असेच वाटले होते. पण झाले पूर्वीप्रमाणेच. लाखांची उड्डाणे ही कोटींपर्यंत पोचली आणि या ‘विशिष्ट’ अधिकार्यांचे स्थान ‘जैसे थे’ राहिले. त्याचा फटका शेवटी बसतोय तो सामान्य माणसालाच.
जसे जसे जमिनींचे दर वाढू लागले, तसे हे ‘विशिष्ट’ अधिकारी जमीन व्यवहारांकडे आकर्षित झाले. लोकांच्या जमिनी बळकावणार्या लँड माफियांबरोबर हातमिळवणी करून, सामान्य माणसाला अक्षरशः देशोधडीला लावण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत. सद्यःस्थितीत शहरातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना, हे ‘विशिष्ट’ अधिकारी मोठ मोठ्या तोडी मध्येच लक्ष घालत असल्याचे दिसून येते. काही प्रकरणां मध्ये न्यायालयाने हा दिवाणी विषय असल्याचे म्हटले आहे, त्याच प्रकरणात हे ‘विशिष्ट’ अधिकारी म्हणतात फौजदारी गुन्हा आहे. जिथे न्यायालय म्हणते हा फौजदारी गुन्हा, तिथे हे म्हणतात दिवाणी विषय आहे. या मध्ये मरण होते ते सामान्य माणसाचेच.
पूर्वीच्या सहपोलिस आयुक्तांनी या सर्व प्रकारांवर पायबंद घातला होता. जवळपास शहरातील सर्वच लँड माफियांनी आपले उद्योग बंद केले होते. यांना मदत करणारे हे ‘विशिष्ट’ अधिकारीही थोड्याकाळा करता शहरातीलच इतर विभागात बदलून गेले होते. ज्या दिवशी या सह पोलिस आयुक्तांची बदली झाली, त्या दिवशी यांची मजल आयुक्तालय व शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयासमोर फटाके उडविण्यापर्यंत गेली. त्या नंतर हे सर्व विशिष्ट अधिकारी परत आयुक्तालयात रूजू झाले.