Mon, Jun 17, 2019 15:17होमपेज › Pune › ‘उजनी’काठी भरली पक्ष्यांची शाळा!

‘उजनी’काठी भरली पक्ष्यांची शाळा!

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 28 2018 11:59PMभिगवण : भरत मल्‍लाव 

उजनी म्हटलं की अग्निपंख, चित्रबलाक, राखी बगळा, स्पून बिल, राजहंस अशा अनेक लक्षवेधी पक्ष्यांचे माहेरघर. जगात, देशात नावजलेले व रुबाबदार दिसत असल्याने पर्यटकांचे लक्षही अशाच पक्ष्यांकडे वळते. मात्र, उजनीतील छोटे पक्ष्यांना कमी लेखू नका बरं का, कारण हे पक्षीही नखरेखोर आहेत. फरक एवढाच की, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र, उजनीतील या छोट्या पक्ष्यांचे नखरे नयनांना जेवढे सुखद धक्‍का देणारे ठरत आहेत तेवढेच ते आपली अप्रतिम सौंदर्याची ओळखही करून देत आहेत.

जगातून व देशातून अनेक पक्ष्यांच्या नामशेष होऊ लागलेल्या व दुर्मिळ जाती उजनीत पहावयास भेटतात. त्याचप्रमाणे जगभरातून आकाश प्रवास करून आलेल्या या पक्ष्यांना पाहण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी हजारो पर्यटकांचे पाय उजनीकडे वळत असतात. बहुतांश पर्यटकांना अग्निपंख, राजहंस, कांडेसर, झोळीवाला बगळा, पाणकावळा, मोर बगळा, सारंग, काळा शराटी, चमचा, कापशी, विविध जातींचे गरुड अशी राजबिंडे पक्षी पाहण्याचा व त्यांची छबी टिपण्याचा शक्यतो प्रयत्न असतो.तुलनेने लहान दिसणार्‍या पक्ष्यांकडे सहसा कोणी लक्ष देत नाही, पण या पक्ष्यांकडे डोळसपणे आणि बारकाईने पाहिले तर हे पक्षीही मोठ्या रुबाबदार पक्ष्यांनाही मागे टाकतील, अशी स्थिती आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात अशा आकाराने छोट्या असणार्‍या पक्ष्यांची मोठी नांदी आहे. त्यांच्याही कवायती नजरेत भरण्यासरख्या आहेत.