Tue, Mar 19, 2019 11:51होमपेज › Pune › पुणेकर खड्ड्यात

पुणेकर खड्ड्यात

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 12:39AMपावसाळा तोंडावर आहे. अनेक रस्त्यांवर असलेले खड्डे महापालिकेने बुजविलेले नाहीत. पावसास सुरुवात झाल्यावर हे खड्डे उखडणार, नवीन खड्डे पडणार, हा दरवर्षीचा अनुभव असूनही महापालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. खड्यामुळे होणारे अपघात आणि पाठीचे दुखणे घेऊन येणार्‍यांची संख्या एकूण रुग्णांच्या 30 ते 35 टक्के असून, यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. मृत्यू ओढावल्यास किंवा जखमी झाल्यास, त्याला महापालिका जबाबदार आहे, असे कायदा सांगतो. मात्र, पुणेकर गेले खड्यात..! या अविर्भावात असलेल्या महापालिकेने शहरात एकही खड्डा नाही, म्हणून हात झटकले आहेत. दुचाकीचालकांना पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासात किती हादरे बसतात याची प्रत्यक्ष नोंद घेऊन, याचे शरीरावर काय परिणाम होतात, महापालिकेची भूमिका काय आणि कायदा काय सांगतो, यावर टीम ‘पुढारी’ने टाकलेला प्रकाशझोत.

पुणे  : टीम पुढारी 

अपघातास निमंत्रण

सध्या पुणे महानगर पालिकेच्या कामांमुळे कात्रज स्वारगेट रस्ता जरी खड्डे मुक्त होत असला तरी या रस्त्यावर धोकादायक चेंबर्स आणि मॅनहोलचे साम्राज्य तसेच आहे. या धोकादायक चेंबर्स आणि मॅनहॉलमुळे पावसाळ्यात मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.कात्रजपासून निघाल्यावर भारती विद्यापीठ, बालाजीनगर, पद्मावती, अरण्येश्‍वर, सिटीप्राईड चौक, लक्ष्मीनारायण चौक, स्वारगेट आदी परिसरांचा समावेश होतो. यामार्गावरून पाहणीदरम्यान अनेक समस्या समोर आल्या आहेत. 

यात सर्वात महत्वाची समस्या म्हणजे मॅनहोलची आहे. रस्त्यावरून जाताना अनेक ठिकाणी रस्त्यातच मॅनहोल आणि धोकादायक चेंबर्स आहेत. हे मॅनहोल रस्त्याला समांतर नाहीत. काही खचलेले आहेत तर काही वर आलेले आहेत. असले मॅनहोल असतील तर खड्ड्यांची गरजच लागणार नाही. यातच पाणी साठून राहणार नाही. संपूर्ण कात्रज ते स्वारगेट रस्ता समान आणि सारखा नाही, त्यामुळेसुध्दा अनेक ठिकाणी पावसाळ्यादरम्यान पाणी साठून राहण्याची शक्यता आहे.

कात्रज रस्ता हा महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून बरीचशी वाहने ये-जा करत असतात. त्यातच सध्या या परिसरात पादचारी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रस्ता बनविण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाचे ढिगारेदेखील रस्त्यातच पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघात होत आहेत. याकडेही पालिका प्रशासनाने व वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चौकातच मोठे खड्डे

रवि दर्शन, हडपसर ते सारसबाग दरम्यान विविध ठिकाणी रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. या रस्त्यावर गोळीबार मैदान चौकात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने तेथील रस्ता खराब झालेला आहे. सर्वात धोकादायकम्हणजे अनेक चौकातच मोठे खड्डे आढळून आले.याव्यतिरिक्‍त इतर 13 ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आढळून आले असून नऊ ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डे्रनेजचे चेंबर तर आठ ठिकाणी स्पीड ब्रेकर असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान मगरपट्टा चौकातून स्वारगेटकडे येताना लागणार्‍या स्पीडब्रेकरमध्ये अनेक वेळी किरकोळ अपघात होत असतात. या मार्गावर चौकातच खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर होत असून खराब रस्त्यांची दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

करा तारेवरची कसरत

सांगवी ते सारसबाग दरम्यान 56 वेळा लहान-मोठ्या धक्के दुचाकीस्वारांना खावेच लागतात. त्याशिवाय प्रवास पुुर्ण होत नाही. याचे सर्वाधिक प्रमाण हे सेनापती बापट रस्त्यावर आहे. रस्त्यावरील खड्डे आणि रस्ते प्लेन करण्याची आवश्यकता आहे, पावसाळ्यात यावरून दुचाक्या घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगवीहून सारसबागेकडे दुचाकीवर प्रवास करताना बालभवनजवळ दोन ठिकाणी दुभाजकाचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मधोमध पत्रे लावले आहेत. त्याचे काम पावसापूर्वी होण्याचे सध्याच्या कामाच्या वेगावरून तरी दिसून येत नाही. ब्रेमण चौकामध्ये रस्त्याच्याच कामामुळे मोठ्ठे खड्डे तयार झाले आहेत. येथे काही दिवसांपूर्वी केवळ माती टाकली होती परंतु पुन्हा खड्डे तयार झाले आहेत.

पुढे सेनापती बापट रस्त्यावर आल्यानंतर दुचाकींस्वारांची खरी कसरत सुरू होते. सेनापती बापट रस्ता दिसताना प्लेन दिसत असला तरी दुचाकीस्वारांना सर्वाधिक धक्के याच रस्त्यावर खावे लागतात. उन्हाळ्यामध्ये डांबर वितळल्याने काही ठिकाणी खचून दुसरीकडे वर आलेले आहेत. त्यावरून दुचाकी गेल्यावर घसरण्याची भिती असते. त्याचबरोबर खड्डे असलेल्या ठिकाणी किंवा तात्पुरती डागडुजी करण्यासाठी डांबरीकरण केलेले आहे. परंतु मुळ पहिल्या डांबरीकरण आणि नवीन डांबरीकरण यांच्या दरम्यान उंटवटे तयार झाले आहेत. पावसळ्यात यावरून लहान टायरच्या दुचाक्या गेल्यानंतर घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची व्यवस्थित पावसळ्यापूर्वी व्यवस्थित डागडुजी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.

गतिरोधकांनी मोडते वाहनचालकांचे कंबरडे

वडगाव  पुल ते सारसबागपर्यंत 14 गतीरोधक असून या प्रत्येक ठिकाणी प्रवाशाला धक्के खावे लागते. वडगाव ब्रिज ते सारसबाग दरम्यान अ‍ॅटोने प्रवास करताना तब्बल 50 धक्के सहन करावे लागले. या धक्क्यांमुळे मनका आणि कमरेचा अजार उद्भवण्याची दाट शक्यता डॉक्टरंनी व्यक्त केली आहे.  वडगाव पुल ते सारसबाग दरम्यान अनेक ठिकाणी चेबर खाली वर  झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यामार्गावर असलेले गतीरोधकांची उंची ही नियमापेक्षा अधिक असून, परिणामी धक्के बसत आहेत. काही 

चौकामध्ये सिंग्नल नसल्याने रस्ता ओलांडणारे पादचारी आणि वााहने अचान समोर येतात. त्यामुळे भारधाव वेगात असलेल्या चालकाला ब्रेक लावाला लागतो. त्यामुळे रिक्षा,बस, चारचाकी, दुचाकीवरील प्रवाशाला धक्का बसतो आहे.  रस्त्याच्या मध्यभागी आणि कडेला खड्डे आहेत. ते पावसाळ्यापुर्वी बुजविने आवश्यक असून, सध्या या मार्गावर एकाही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, गतीरोधकांची उंची कमी करण्याची मागणी रिक्षा चालकांने केली आहे.  

खड्ड्यांमुळे दुखापत झालेले 30 टक्के रुग्ण!

खडयांमुळे अपघात होउन हात-पाय, डोक्याला मार लागण्याचे प्रमाण वाढले आहे. खडयामुळे प्रामुख्याने गुडघ्याच्या लिगामेंटस (अस्थिबंधन) तुटण्याचे, कमरेच्या मणक्याला दुखापत होणे, त्यामधील गादी निसटने (स्लिपडिस्क), मानेचा मनक्याला दुखापत होणे हे अपाय होत आहेत. यामुळे एकुण अस्थिरोगाच्या रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण खडयांमुळे झालेल्या दुखापतीमुळे येत असून त्यामध्ये तरूणांची संख्या प्रचंड असल्याची माहिती तज्ज्ञ देतात. 

अस्थिरोग तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार खडयामुळे दोन प्रकारचा अपघात होउ शकतो. पहिला प्रकार म्हणजे खडयातून गाडी गेल्याने गाडीवरून उडून खाली पडून डोक्याला, हाताला, पायाला मार लागून फ्रॅक्चर होणे, तसेच रस्त्यावर अचानक पडल्याने पाठीमागुन आलेले वाहन डोक्यावरून गेल्याने जीव गमावण्याची भिती असते. तर दुस-या प्रकारात खडडा पाहून गाडीला अचानक ब्रेक लावला तर त्यामुळे तोल जातो. वेगात असलेल्या शरीराचा तोल सांभाळण्यासाठी अचानक पाय टेकल्याने गुडघ्याच्या लिगामेंटस तूटल्याचे रुग्ण मोठया प्रमाणात येत आहेत. वर्षाला पुण्यात किमान 1500 पायाची लिगामेंट तुटल्याचे रुग्ण येत असल्याची माहिती शहरातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नितीन भगली यांनी दिली. तसेच खडयातून प्रवास करताना कंबर, पाठ, मानेच्या मनक्यांना दणका बसतो. हाडांची घनता आणि वय यानुसार त्या रुग्णांना त्रास होतो. यामुळे तरूणांमध्ये छाती आणि कमरेच्या मधील सात मणक्यांना मल्टिपल फ्रॅक्चर, मणक्यातील गादी सरकरणे (स्लीपडिस्क) हे प्रमाण दिसून येत आहे. तर वयोवृध्दांमध्ये हाडे ठिसूळ झाल्याने मणक्याला गंभीर दुखापत होते, आकार बदलतो. यामुळे रुग्णाला दोन ते तीन महिने आराम करावा लागतो. तरी बरे न झाल्यास लहान तसेच मोठया शस्त्रक्रिया कराव्या लागतात, असेही डॉ. भगली यांनी सांगितले.

रोज एक रुग्ण

सध्या तरी गाडीवरून पडल्यामुळे एका अस्थ्रिोगतज्ज्ञाकडे एक तरी रुग्ण भेट देत आहे.  पुण्यात जवळपास 400 अस्थिरेागतज्ज्ञ आहेत. त्यावरून याचे गांभीर्य लक्षात येते. विशेषतः हे प्रमाण पावसाळयात दुप्पट ते तिप्पट होते. यामध्ये मणका, डोके, खुबा यांना दुखापत होणे, लिगामेंटस तुटणे, स्लिपडिस्क अशा स्वरुपाच्या तक्रारी येत असल्याची माहिती पुणे आर्थोपेडिक सोसायटीचे माजी अध्यक्ष व अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नीरज आडकर यांनी दिली.

मानवी हक्कांचे उल्लंघन

खड्डे हा मानवी हक्कांचा विषय आहे. खड्डेविरहित रस्ते नसणे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. मागील सहा वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाने खड्ड्यांच्या विषयाच्या अनुषंगाने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर कमिटीची स्थापना होऊन त्या कमिटीने पुणे येथेदेखील भेट दिली होती. या वेळी त्यांनी सर्व रस्त्यांचे परीक्षण केले होते. खड्डे रस्त्यावर असणे हे चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण नाही. रस्त्यांवर खड्डे असणे म्हणजे पायाभूत सुविधांच्या दर्जामध्ये भ्रष्टाचार आहे, हा त्याचा अर्थ आहे. पालिकेने याबाबत कॉन्ट्रॅक्टरला दोषी धरण्याची तरतूद केली पाहिजे.  

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रस्त्यांचे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरकडे होते, यासंबंधी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. त्यानार आता पाट्या लावल्या जातात. लोकांना जर तक्रार करायची असेल तर ती कोणाविरोधात करायची ते माहिती पाहिजे. कामामध्ये त्रृटी उद्भवल्या तर अशा कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरले पाहिजे. त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपवतानाच तुमच्या सेवेत त्रृटी आढळल्यास तुमच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नागरिकांना राहतील, अशा पद्धतीचे पाऊलदेखील पालिकेनी उचलण्याची गरज आहे. त्यानंतर नागरिकांना ग्राहक न्यायालयांमध्येही दाद मागता येईल.