Sat, Jul 20, 2019 09:07होमपेज › Pune › अतिक्रमण कारवाईसाठी हवे विशेष पोलिस ठाणे

अतिक्रमण कारवाईसाठी हवे विशेष पोलिस ठाणे

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:52AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांसह अनधिकृत विक्रेते, व्यावसायिक व फ्लेक्स-होर्डीग्जवर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पुरेशा मनुष्यबळासह पोलिस ताफा नाही. त्यामुळे कारवाई करताना अडचणी येत असून, महापालिकेस तब्बल 106 पोलिस कर्मचार्‍यांची फौज मिळावी म्हणून महापालिका प्रशासन गेल्या आठ वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. 

शहरातील अनेक भागात अनधिकृत बांधकाम सर्रासपणे केले जात आहे. नदी काठ, शेती, आरक्षित जागा आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ आणि पोलिस बळ नाही. पोलिस बंदोबस्तासाठी त्या भागातील पोलिस ठाण्याशी पत्रव्यवहार करावा लागतो. मूळात त्यांच्याकडेच कमी मनुष्यबळ असल्याने ते महापालिकेस अतिरिक्त पोलिस बंदोबस्त देण्यास नाखूश असतात. यामध्ये अधिक वेळ जातो. परिणामी, कारवाई करण्यास विलंब होत असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.  

तसेच, शहरातील अनेक रस्ते आणि पदपथ अनधिकृत विक्रेते, फेरीवाले, दुकानदार, कार डेकोरेटर्स, वर्कशॉप, टपर्‍या, पंक्‍चर दुकाने, गॅरेज आदी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. शहरातील प्रशस्त रस्ते अपुरे पडत आहेत. परिणामी, पादचार्‍यांना रस्त्यांवर ये-जा करणे असुरक्षित झाले असून, वाहतूककोंडीत भर पडून वाहनचालक त्रस्त आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी करून महापालिका व वाहतूक पोलिस कारवाई नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेकडे सध्या केवळ 22 पोलिस कर्मचारी आहेत. त्यातील काही गैरहजर असतात.

त्यामुळे पुरेसे पोलिस बळ महापालिकेकडे सध्या नाही. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने राज्य शासनाकडे 106 पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांची स्वतंत्र विशेष पोलिस ठाण्याची मागणी 19 सप्टेंबर 2009 पासून करीत आहे. त्यास तब्बल 8 वर्षे झाले तरी अद्याप यश आलेले नाही. शहरातील नागरी भागात अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी सदर ठाण्याची मागणीचे पत्र 2009, 27 जून 2013 आणि नुकतेच 14 ऑगस्ट 2017 ला दिले होते. अद्याप त्यास शासनाने प्रतिसाद देऊन मंजुरी दिलेली नाही. 

त्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. तसेच, पुण्याचे पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांच्याशी चर्चाही केली आहे. त्याचबरोबर शहरातील तिन्ही आमदार आपआपल्या परीने या संदर्भात राज्य शासनदरबारी पाठपुरावा करीत आहे.

शासनाची मान्यता मिळताच हे विशेष पोलिस ठाणे महापालिकेकडून निर्माण केले जाणार आहे. त्या पोलिस बंदोबस्तात शहरातील अनधिकृत बांधकामे व विक्रेते त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग्जवर नियमितपणे कारवाई केली जाईल. प्रभागनिहाय अतिक्रमण विरोधी कारवाई, बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणे आदी कामे या पोलिस पथकाच्या माध्यमातून नियमितपणे करून घेण्यात येतील. त्यामुळे रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे हटवून ते खुले केले जातील. त्यानंतर शहरातील सर्व रस्ते व पदपथ पादचारी व वाहनचालकांना वापरता येतील. परिणामी, वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल, असे अधिकार्‍यांनी मत आहे.