Mon, Aug 19, 2019 01:02होमपेज › Pune › आयटीयन्सची विशेष बसथांब्याची मागणी प्रलंबित

आयटीयन्सची विशेष बसथांब्याची मागणी प्रलंबित

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 12:30AMपुणे : नरेंद्र साठे

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूरनंतर महाराष्ट्रातील अनेक शहरात एसटीच्या हिंजवडीतून फेर्‍या सुरू झाल्या. साधारण दोन वर्षांपासून हिंजवडीतून दर शुक्रवारी सायंकाळी या बस महाराष्ट्रातील विविध शहरांकडे जाण्यासाठी सज्ज असतात. रस्त्याच्या बाजूला उभ्या राहणार्‍या बससाठी आणि आयटीयन्स प्रवाशांसाठी निवारा करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून आयटीयन्स मंडळी करत आहेत. विविध पातळीवर प्रयत्न करून देखील आयटीयन्स मंडळी हिंजवडीतील एसटीच्या थांब्यापासून दूरच आहेत.

हिंजवडीतील फेज 3 किंवा फेज 2 मधून या बस दर शुक्रवारी रवाना होतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बसथांब्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या, फेज 3 मधील अग्निशमन केंद्राच्या जवळील जागेची पाहणी देखील अधिकार्‍यांनी केली मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नसल्याची माहिती एका आयटीयन्स तरुणाने दिली. हिंजवडीतून राज्यभरात विविध ठिकाणी एसटीची सुविधा सुरू करण्यात आली. या सेवेला अल्पावधितच आयटीयन्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हिंजवडीतून निघणार्‍या एसटी बस सध्या रस्त्याच्या बाजूला थांबतात या बस चालकांना आणि आयटीयन्स प्रवाशांना येथे थांबण्यासाठी एसटी महामंडळाकडून कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. यासाठी आयटीयन्स मंडळींनी एसटीकडे बस स्थानकासाठी पाठपुरवा करत आहेत. 

हिंजवडीतून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ समुहच्या माध्यमातून पहिल्यांदा कोल्हापूरसाठी सुरू झालेली एसटीची सेवा आता बारा मार्गावर सुरू झाल्या आहेत. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ पटर्नमुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडतच आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप समूहाचे अल्पावधीतच तीन समूह तयार झाले. सध्या पंधराहून अधिक मार्गांवर एसटी सुरू आहेत. हिंजवडीतील वाहतूककोंडीतून मार्ग काढत बाहेर येण्यास वेळ जात असल्याने कंपनीच्या प्रवेशद्वारातूनच एसटी बस उपलब्ध होत असल्याने आयटीयन्स एसटी बसने प्रवास करण्यास पसंत करत आहेत.