होमपेज › Pune › विमानतळासाठी विशेष प्राधिकरण

विमानतळासाठी विशेष प्राधिकरण

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:57AM



पुणे : प्रतिनिधी

पुरंदर विमानतळाचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावावेत, याकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळास विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्या संदर्भातील दर्जाचा आदेश व विमानतळाच्या भूसंपादनाचे आदेश येत्या आठ दिवसांत काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ‘पुढारी’ला दिली. 

वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांबरोबर पुरंदर विमानतळासंदर्भात बैठक झाली. या वेळी सामान्य विभागाच्या सचिव वल्सा नायर, महसूल विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव, जिल्हाधिकारी सौरभ राव, विमानतळ प्राधिकरणाचे एमडी सुरेश कंकाणी आदी उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात बोलताना राव म्हणाले, विमानतळास संरक्षण खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यपद्धती निश्‍चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

त्यामध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्या संदर्भातील दर्जाचा आदेश आठ दिवसात काढण्यात येणार आहे. याच बरोबर भूसंपादनाची अधिसूचना देखील पुढच्या आठवड्यात काढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत.  त्याबाबतचे आदेश येत्या आठवडाभरात राज्य सरकारकडून काढण्यात येतील. जिल्हाधिकारी या  प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यानंतर नवीन भूसंपादन कायदा आणि एमआरटीपी ऍक्टनुसार या प्राधिकरणामार्फत भूसंपादन करण्यात येणार्‍या जमिनींचे गट आणि सर्व्हे नंबरची छाननी दोन आठवड्यांत करण्यात येईल. त्यानंतर लगेच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, भूसंपादनासाठीचा मोबदला जाहीर करणे आणि भूसंपादनाची प्रकिया सुरू करण्याचे  देखील नियोजन करण्यात आले  आहे. 

भूसंपादनासाठी स्वतंत्र पाच युनिट स्थापन करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्याबाबत माहिती देताना राव म्हणाले, लवकरच महसूल विभाग, वित्त विभाग आणि नगरविकास विभाग यांची एकत्रित बैठक होईल. त्यामध्ये या संदर्भात निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले. ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. भूसंपादन गतीने व्हावे, यासाठी उभारण्यात येणार्‍या या यंत्रणेसाठीचा खर्च महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने करावा,” असेही या बैठकीत ठरले. याच बरोबर दि. 23 एप्रिल येथे दिल्‍ली येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी अन्य प्रश्‍नांवर चर्चा होणार असल्याचे राव यांनी सांगितले.  पुरंदर विमानतळाचा डीपीआर’ तयार करण्याचे काम महामंडळाकडून जर्मनीच्या डार्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीला प्रारूप डीपीआर, तसेच तांत्रिक व वित्त अहवाल येत्या मार्चअखेरपर्यंत सादर करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या; तर 31 जुलै अखेरपर्यंत अंतिम डीपीआर सादर करावा, असे आदेश संबंधित कंपनीला देण्यात आल्याचे राव यांनी या वेळी सांगितले.

पुरंदर विमानतळ मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प

विमानतळ उभारणीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला संबंधित विभागाच्या कामकाजाच्या प्रगतीची माहिती ते स्वतः घेणार आहेत; तसेच विमानतळासाठी शासनाच्या अन्य विभागांच्या परवानग्या लागणार आहेत. त्या विभागांनी तातडीने परवानग्या द्याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असे राव यांनी सांगितले. स्वःता मुख्यमंत्री या संदर्भात लक्ष घालत असून पुरंदर विमानतळ त्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. 

 

Tags ; pune, pune news, Purandar Airport, Special authority,