Tue, Nov 20, 2018 06:11



होमपेज › Pune › विशेष कार्य अधिकार्‍याची वैद्यकीय अधीक्षकाला धमकी

विशेष कार्य अधिकार्‍याची वैद्यकीय अधीक्षकाला धमकी

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:10AM

बुकमार्क करा





पिंपरी : प्रतिनिधी

कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्माकर पंडित यांनी शुक्रवारी सकाळी आपल्याला रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रोखून धमकावले, अशी तक्रार  वायसीएमएच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. डॉ. पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी, त्यांची पालिकेतील सेवा समाप्त करण्याची मागणी या पत्रात केली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.याबाबतचे पत्र पत्रकारांच्या  हाती लागले आहे. दरम्यान, मी कोणालाही धमकी दिली नाही, असे काहीच घडले नाही, असे डॉ पंडित यांनी सांगितले.  

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविलेल्या पत्रात डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी मी रुग्णालयामध्ये प्रवेश करत असताना डॉ. पंडित यांनी मला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर रोखून धमकावले. त्यांची कर्तव्य रजा मंजूर केली नाही म्हणून ‘माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईल’. माझ्या नादाला लागाल तर मी सगळ्यांची वाट लावीन, अशी धमकी दिली आहे. 

डॉ. पंडित  यांनी यापूर्वीदेखील अनेकदा मला धमकावण्याचा प्रयत्न केला असून, ते कार्यालयीन कामकाजामध्येही नाहक ढवळाढवळ करीत आहेत. त्यांच्या अशा वर्तनामुळे रुग्णालयामध्ये कामकाज करणे जिकिरीचे होत आहे. तसेच त्यांनी वारंवार मी वरिष्ठ असून, वैद्यकीय अधीक्षक मला कनिष्ठ असल्याचे बोलून दाखविले आहे. त्यामुळे ते कार्यालयीन कामकाजमध्ये अडवणूक करतात. डॉ. पंडित यांचे हे वर्तन घातक असून, त्यांच्यावर बंधन घालणे आवश्यक आहे; अन्यथा डॉ. पंडित  हे मला अथवा अन्य कोणत्याही अधिकार्‍यास नुकसान पोहोचवू शकतात, अशी माझी धारणा झाली असल्याचे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे. 

त्यामुळे डॉ. पंडित  यांच्यावर नियमाधीन कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी. त्यांची पालिकेतील सेवा समाप्त करण्याची विनंती देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे रुग्णालयातील कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर डॉ. पंडित  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगीदेखील डॉ. देशमुख यांनी आयुक्तांकडे मागितली आहे. 

याबाबत बोलताना डॉ. पद्माकर पंडित म्हणाले, तुम्ही असो करायला नको होते. प्रेमाने सगळे मिटविले असते, असे मी त्यांना म्हणालो. ते मला तिथे काम करू देत नाहीत आणि तेदेखील काम करत नाहीत.  सकाळी आमची भेट झाली. मी केवळ तुम्ही मला सहकार्य करा असे त्यांना म्हणालो. त्यांना धमकी देण्याचे काही कारण नसून, असे काही घडले नसल्याचा दावा डॉ. पंडित यांनी केला.याबाबत डॉ. मनोज देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेरगावी असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलण्याचे टाळले.