Wed, Jul 17, 2019 09:58होमपेज › Pune › शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी विशेष नियोजन प्राधिकरण

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी विशेष नियोजन प्राधिकरण

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 13 2018 12:37AMपुणे : प्रतिनिधी

शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा (एसपीए) दर्जा देण्यासंबंधीचा प्रस्ताव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.  मात्र, या मार्गात पुणे महापालिकेचा जवळपास 75 टक्क्यांपेक्षा अधिक परिसर येत असल्याने या मार्गाला एसपीएचा दर्जा मिळाल्यास महापालिकेला मोठा फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे या मार्गास एपीएचा दर्जा देण्याबाबत महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला आहे. पीएमआरडीएकडून शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. 23.3 किमी लांबीच्या या मेट्रो मार्गासाठी तब्बल 8 हजार 300 कोटींचा खर्च येणार आहे. 

पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया  पूर्ण झाली आहे.  हा प्रकल्प उभारण्यासाठी या मेट्रो मार्गावरील दोन्ही बाजूंनी पाचशे मीटरपर्यंतचा परिसरातील बांधकामासाठी चार एफएसआय देण्याची मागणी पीएमआरडीएकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर या क्षेत्राला विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) चा दर्जा देण्याचा प्रस्तावही पीएमआरडीएकडून नगरविकास खात्यास पाठविण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

या मार्गाला एसपीएचा दर्जा मिळाल्यास या भागाच्या विकासाचे सर्व हक्क आणि त्याचबरोबर बांधकाम परवानगीतून मिळणारे उत्पन्नही पीएमआरडीएकडे जाणार आहे. प्रामुख्याने बाणेर, बालेवाडी, औंध हा महत्वाचा भाग हा एपीएच्या अंतर्गत जाऊ शकतो. त्यामुळे  त्याचा मोठा फटका प्रामुख्याने पुणे महापालिकेला बसण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, त्या प्रस्तावावर अद्याप राज्य शासनाने निर्णय घेतलेला नसून त्यावर पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

उत्पन्नाची अपेक्षा नाही

हिंजवडी- शिवाजीनगर या मेट्रो मार्गाला प्राधिकरणाच्या बैठकित मंजुरी देतानाच एसपीए स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रामुख्याने मेट्रोचे स्टेशन तसेच अन्य कामांसाठी बांधकाम परवानग्या घ्यावा लागणार आहेत. त्यासाठी पालिकेकडे हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी पीएमआरडीएलाच हे अधिकार मिळावेत आणि त्यामाध्यमातून प्रकल्पाला वेग मिळावा असा एपीएच्या स्थापनेचा प्रमुख हेतू आहे. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नात आम्हाला मुळीच अपेक्षा नाही, अशी माहिती पीएमआरडीएच्या अधिकार्‍याकडून देण्यात आली.

पालिकेचाही एसपीएला  विरोध

पीएमआरडीएच्या मेट्रो मार्गात 75 टक्क्यांपेक्षा अधिक भाग पुणे महापालिकेचा आहे. त्यामुळे या भागाला एसपीएचा दर्जा मिळाल्यास महापालिकेचे बांधकाम परवानगीचे उत्पन्न गमवावे लागेल. याव्यतिरिक्त या भागाला सुविधा मात्र पालिकेलाच द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने त्यास विरोध दर्शविला असून त्यासंबंधीचा नकारात्मक अभिप्राय आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.