Mon, Feb 18, 2019 19:41होमपेज › Pune › मोबाईलवर बोलणे पडले महागात

मोबाईलवर बोलणे पडले महागात

Published On: Jun 13 2018 1:54AM | Last Updated: Jun 13 2018 1:45AMपुणे : प्रतिनिधी

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणार्‍या चालकांना वाहतूक विभाग आणि आरटीओने चांगलाच दणका दिला आहे. वर्षंभरात तब्बल 779 वाहनचालकांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे अनेकदा जीवघेणे ठरते. त्यामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. 

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत वाहन चालवणार्‍यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्यानंतर संबधितांचे लायसन्स आरटीओ कार्यालयात पाठविले जाते. दरम्यान दंडात्मक कारवाई करणार्‍या पोलिसांकडून आता थेट प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीने परवाना निलंबनाची कारवाई केली जात आहे. 

मोबाईलवर बोलत वाहन चालविणार्‍यांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होते. वाहतूक पोलिसांकडून याबाबत वारंवार जनजागृती केली जाते. दोषी वाहनचालकांकडून 200 रुपये दंड आकारला जात होता. मात्र, या कारवाईचा योग्य परिणाम दिसण्याऐवजी मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, नो पार्किंगमधून जाणे, सिग्नल तोडणे, भरधाव वेगाने जाणे हे प्रकार वाढतच राहीले. त्यामुळे अशा वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली. परवाना निलंबनाच्या भीतीमुळे प्रकाराला आळा बसला आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या वर्षभरामध्ये वाहतूक पोलिसांकडून आरटीओच्या मदतीने तब्बल 779 चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. आरटीओ कार्यालयाकडून संबंधित चालकाला नोटीस देऊन तीन महिन्यांसाठी त्याचा परवाना निलंबित केला जातो.