होमपेज › Pune › ब्लॉग : चिवचिवाट पुन्हा अनुभवता येईल!

ब्लॉग : चिवचिवाट पुन्हा अनुभवता येईल!

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 2:06AMपुणे : अपर्णा बडे

‘चिऊ ताई, चिऊताई दार उघड’, ‘एक घास चिऊचा..’ अशा चिऊताईच्या अनेक  गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. जणू ती आपल्या घरातील एक सदस्यच होती. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाच्या सुरक्षा साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या चिमणीची संख्या कमी झाली आहे. भ्रमणध्वनीच्या मनोरर्‍यांमुळे ही संख्या कमी झाले असल्याचे काहींचे म्हणणे असले, तरी याला अद्याप शास्त्रीय आधार मिळालेला नाही. सिमेंटची जंगले, वृक्षतोड यामुळे  चिमण्यांच्या अधिवासावर गदा आली असून, त्यांची संख्या या कारणांमुळे नक्कीच कमी झाली आहे. चिमणीची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा, आहे त्या चिमण्या व त्यांचा अधिवास कायम आबाधित ठेवल्यास त्यांची संख्या नक्की वाढेल आणि त्यांचे चिवचिवणे पुन्हा एकायला मिळेल, असे मत निसर्गअभ्यासकांनी जागतिक चिमणी दिवसानिमित्त व्यक्त केले.

सतत चिवचिवणारी, बुलबुलपेक्षा आकाराने लहान असलेली चिमणी, युरोपसह आशियाई देशात आढळते. भारतात चिमणीच्या पाच प्रजाती आढळतात. यात पितकंठी चिमणी, घर चिमणी, जावा चिमणी, पहाडी चिमणी, वृक्ष चिमणी अशा पाच प्रजाती आहेत. त्यातील आपल्या भागातील लाडकी चिमणी म्हणजे, घर चिमणी. इंग्रजीत तिला ‘हाऊस स्पॅरो’ असे म्हणतात. ही भारतात सर्वत्र आढळते. भिंती, कौलारूंची घरे आदी ठिकाणी ती आपले घरटे (खोपा) बांधून वास्तव्य करीत असते. 

गेल्या काही वर्षांत, शहरातून तसेच गावातूनही चिमणीचे अस्तित्त्व नाहीसे होऊ लागले आहे. चिमण्यांच्या अधिवासावर आलेली गदा तिच्या नष्टचर्यामागील मूळ कारण आहे. विकासाच्या दिशेने धावणार्‍या शहरात झाडांची कत्तल करुन, सिमेंटचे जंगल उभारले जात आहे. खेडयातही मातीची व कौलारू घरे आता सिमेंटच्या घरात परिवर्तित होत आहेत. एकंदरीत चिमण्यांचा जो थोडाफार अधिवास गावांमध्ये शिल्लक होता, तोही आता शहरीकरणात बदलत आहे. 

चिमणी एका वेळी तीन ते चार अंडी देते. यासाठी त्यांना मिलन काळात आंघोळीसाठी मातीची गरज असते, पण ती जागा आता सिमेंटने घेतली आहे. घरटी तयार करण्यासाठी त्यांना गवत आणि इतर नैसर्गिक काडीकचरा लागतो. तशी घरटी असतील तरच अंडयांसाठी लागणारे तापमान नियमन होते आणि प्रजननाचा दर वाढतो. तसेच गवत आणि हा काडीकचरा तिला मिळेनसा झाल्याने, सिमेंटच्या घरातील वीज मोजणार्‍या यंत्रावर किंवा सिमेंटच्या पानावर, असा कुठेतरी चिमण्या आसरा घेतात. तेथील तापमान त्यांना सहन होत नाही आणि झाले तरी उंचावरून पिले पडून बरेचदा मृत्युमुखी पडतात. चिमण्यांचे खाद्य हे गवताच्या बिया, धान्य, अन्न, पिकांवरच्या अळ्या, झाडांवरचे कीटक आदी आहे. मात्र  रासायनिक प्रक्रियेतून जाणार्‍या अन्नधान्याचाही चिमण्यांवर विपरीत परिणाम होतो. मुळातच या कारणांकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे. चिमण्यांची संख्या वाढावी यासाठी तिचा नैसर्गिक अधिवास वाचविणे आवश्यक आहे. 

शहरात कृत्रिम घरट्यांचा व्यवसाय जोरात

चिमण्यांचे नैसर्गिक अधिवास शहरीकरणाच्या नादात नष्ट झाले आहेत. हे अधिवास नष्ट होत आहेत, म्हणून तिला कृत्रिम अधिवास पुरवण्याच्या नादात, शहरात अनेकांनी कृत्रिम घरटयांचा व्यवसाय जोमात सुरू केला आहे. मात्र, कृत्रिम अधिवासामुळे चिमण्या वाढतील असे नाही. यासाठी तिचा मूळ अधिवासच महत्वाचा आहे. तिचा मूळ अधिवास परत मिळवून देण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. ज्या शहरात चिमण्यांची संख्या अधिक आहे, तेथील पर्यावरण उत्तम असते, असे जाणकारांचे मत आहे.

Tags ; Pune, Pune News, Sparrows, World Sparrow Day,