Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › अप्पर तहसिल कार्यालयाला हवी प्रशस्त जागा

अप्पर तहसिल कार्यालयाला हवी प्रशस्त जागा

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:28PM

बुकमार्क करा

नेहरूनगर ः बापू जगदाऴे

शहराची लोकसंख्या व कामाचा वाढता ताण तसेच अपुरी जागा पाहता प्राधिकरणच्या इमारतीतील पिंपरी चिंचवड अप्पर तहसिल कार्यालयाला स्वतःच्या प्रशस्त जागेची निकड भासत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या शासकीय कामांचा निपटारा केला जातो. परंतु, अपूरी कर्मचारी संख्या व जागा पाहता येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवडणुका आल्या की, तहसिल कार्यालयाला हक्काची जागा मिळवून देऊ म्हणणार्‍या लोकप्रतिनिधींना निवडणुका होताच या आश्वासनाचा विसर पडतो. हा विसर सामान्य नागरिकांच्या कामात अडथळा ठरत आहे. यासाठी महापालिका आयुक्तांनीच या समस्येत लक्ष घालत महापालिकेची एखादी प्रशस्त इमारत अप्पर तहसिल कार्यालयास द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वर्षभर अप्पर तहसिल कार्यालयातून आधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नाँनक्रिमीलेअर दाखला, गौणखनिज उत्खनन दाखला याशिवाय अन्य वीस दाखले मिऴण्याची सर्व प्रक्रीया या कार्यालयामार्फत राबवली जाते. तसेच, इतरही अधिकार प्रविष्ट  प्रकरणाच्या दंडात्मक कारवाईचे कामकाजही येथूनच होते. त्यामुऴे तहसिल कार्यालयाचे महत्व व गरज किती आहे हे लक्षात येते.

शहराची लोकसंख्या 22 लाखांपुढे असून दरवर्षी ती झपाट्याने वाढत आहे. त्या पटीतच येथील कामकाजाचा भारही वाढत आहे.  हा सर्व भार येथे कार्यरत असलेल्या अप्पर तहसिलदार, नायब तहसिलदार व त्यांच्या हाताखाली कार्यालयात असलेल्या  त्यांच्या व्यतिरिक्त दोन व्यक्तींवर पडत आहे. यामुऴे नागरिकांची कामे अधिक जलदगतीने होण्यासाठी अतिरिक्त कर्मचार्‍यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्येबरोबरच या कार्यालयाला असलेली जागीही तोकडीच आहे.

त्याबरोबरच हे कार्यालय शहराच्या एका टोकाला असून सर्वसामान्यांसाठी गैरसोयीचे आहे. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त जागेचीही अत्यंत गरज या कार्यालयाला आहे.  या कार्यालयाच्या माध्यमातून महिन्याभराला शहरातील हजारो नागरिकांचा संपर्क येतो तर शाळा व महाविदयालयाच्या प्रवेशावेळी हा आकडा लाखाच्या पटीत जातो. त्यामुऴे या कार्यालयातील नागरिकांची वर्दळ पाहता जागेबरोबरच कर्मचारीही उपलब्ध करून देणे  गरजेचे आहे.